esakal | ईडीने काय करावे हे कुणी ठरवू नये!
sakal

बोलून बातमी शोधा

ईडीने काय करावे हे कुणी ठरवू नये!

ईडीने काय करावे हे कुणी ठरवू नये!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजकीय पक्षांनी केंद्रीय यंत्रणांकडे तक्रार द्यावी; मात्र त्या यंत्रणांनी काय करावे, हे सांगण्याचा कुणालाही अधिकार नाही. ती देशासाठी, यंत्रणांसाठी चांगली गोष्ट नाही, अशा शब्दांत ईडीच्या वाढत्या राजकीयकरणावर भाजप नेते आशीष शेलार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. चौकशी यंत्रणेच्या कार्यालयात जाण्यात काही चूक नाही. ईडी, सीबीआयकडे तक्रार करायची असेल तर शेवटी तुम्हाला त्या कार्यालयात जावे लागेल; मात्र तक्रारीच्या ठिकाणी जाऊन कुणाला, कुणाच्या कुटुंबाला त्रास दिला असेल, हेटाळणी करण्याचा प्रयत्न झाला असेल तर ते सर्वार्थाने चुकीचे आहे असेही ते म्हणाले. ‘सकाळ’च्या ‘कॉफी विथ सकाळ’ या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले.

शेतकऱ्यांबाबत मोदी सरकार संवेदनशील

उत्तर प्रदेशात आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. कुठलाही मृत्यू हा समर्थनीय असू शकत नाही; मात्र तेथील सरकारने त्यावर भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर आल्यास यावर अजून प्रकाश पडेल. भाजपची शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्वसमावेशक भूमिका आहे, परंतु दरवेळी फक्त आमचेच ऐकले पाहिजे अशी भूमिका घेऊन इतके दिवस आंदोलन केल जात आहे ते चुकीचे आहे.

अधिवेशन तरी नीट घ्यावे

राज्याच्या हितासाठी कोणी गंभीर नाहीत. त्यामुळे संवादही होत नाही. अधिवेशने नीट चालत नाहीत. सभागृहात गोंधळ सुरू असताना मी फक्त आमच्या सदस्यांना खाली आणायला गेलो होतो. मी काहीही केले नसताना मला निलंबित केले. तुम्ही अजूनही क्लिप काढून पाहू शकता. मी भास्कर जाधवांच्या केबिनमध्ये गेलो नाही; मात्र आमचे म्हणणेही ऐकूण घेण्यात आले नाही. मला त्याबद्दल काही म्हणायचे नाही, तो त्यांचा अधिकार आहे; मात्र अधिवेशन तरी नीट घ्यावे. त्यामुळे अपेक्षित काम होत नाही.

कोरोना काळात अपेक्षाभंग

कोरेानाच्या काळात ज्या अपेक्षेने राज्य चालवायला हवे होते, त्या पद्धतीने चालवले गेलेले नाही. देशात लॉकडाऊनला पहिल्यांदाच आमच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला होता, परंतु पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वीच दीड दिवस अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन लावला. पंतप्रधानांनी या काळात सर्वच काम सकारात्मक पद्धतीने केले, परंतु केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार केवळ नकारात्मकतेने वागले.

आरोग्यमंत्री राज्यभर फिरले, याबद्दल त्यांचे कौतुक आहे; मात्र संपूर्ण राज्याला कोरोना लस मिळाल्यानंतर त्याचा साठा फक्त आरोग्य मंत्र्यांच्या जालन्यात जाईल अशी अपेक्षा नव्हती. आम्ही बोललो तर आमच्यावर राजकारण करण्याचा आरोप होतो; मात्र या काळात अनेक उत्तरे शोधण्यासाठी सरकारने पळवाटा शोधल्या. कोरोनाचे निर्बंध उठवण्यातही काही जणांनी धंदा केला.

पक्षात नवे चेहरे

पक्षात कोणाला घ्यायचे, कोणाला संधी द्यायची याचा निर्णय आमची संसदीय समिती घेते. भाजप हा एका कुटुंबाचा पक्ष नाही. आम्ही लोकशाही मानतो. जे बाहेरून पक्षात येतात त्यांचे कर्तृत्व, मूल्य याचा विचार केला जातो. त्यानुसार संधी देण्याचा निर्णय समिती घेते.

उद्या राहुल गांधी यांना पक्षात यावे वाटले तर ते येऊ शकतात, परंतु त्यांना भाजप घेईल की, नाही माहीत नाही. आमच्याकडे जो तो आपल्याला दिलेले काम करतो. विनोद तावडे सध्या हरियाणात काम करत आहेत. तावडे चर्चेत किंवा फोटोत दिसत नसले तरी ते त्यांच्या पद्धतीने काम करतात. तावडे यांनी आपली सोशल मीडियावरील गती वाढवायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे.

२०१४ पासून मोदी टार्गेटवर

२०१४ पासूनच केंद्र सरकारच्या विरोधात हटवादी भूमिका सुरू आहे. फिल्म इन्स्टिट्यूटला गजेंद्र सिंग यांची संचालक म्हणून निवड केल्याने त्याविरोधात महिनोन् महिने आंदोलने करण्यात आली. सीए कायद्याच्या विरोधात आणि एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर पुरस्कार वापसी, डिग्री वापसी अशी अनेक आंदोलने करून मोदी सरकारच्या विरोधात एक गट आंदोलन करत आहे. आंदोलनाच्या माध्यमातून हा देश अस्थिर झाला आहे, असे जगासमोर चित्र निर्माण केले जात आहे.

मुख्यमंत्री कर्तृत्ववान?

राज्यातील मुख्यमंत्री हे चांगले काम करत असल्याचा त्यांना फिडबॅक येतोय. काही सर्वेक्षणंही त्यांची लोकप्रियता वाढल्याचे सांगताहेत यावर शेलार म्हणाले, कोणत्या सर्वेक्षणाला किती महत्त्व द्यायचे हा प्रश्न आहे. लोकांना काय वाटते हे महत्त्वाचे आहे; अन्यथा हे सर्वेक्षण त्यांनाच लखलाभ ठरो. सर्वोत्तम मुख्यमंत्री कर्तृत्वावर व्हायला पाहिजे, स्वत:च्या आवडीच्या आधारे केलेल्या सर्वेक्षणावरून नको.

आमचा चेहरा फडणवीसच

मुंबई‍ महापालिका आणि राज्यातील निवडणुकांबाबत आम्ही काम करतोय. त्यासाठी रणनीतीही ठरली आहे. टप्प्याटप्प्याने ठरलेल्या रणनीतीच्या आधारवर काम करत आहे. बुथपासून ते अनेकांचे पक्षप्रवेश, नवीन लोकांना जोडण्याचे काम केले जाणार आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली लढणार असलो तरी चेहरा हा आमचा देवेंद्र फडणवीसच असेल आणि त्या चेहऱ्याच्या आधारावरच आम्ही निवडणुका लढणार आहोत. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील मतदारांचा मूड हा पूर्णपणे भाजपच्या बाजूचा आहे आणि तसाच कलही आहे.

सरकार पाडण्याचा दावा नाही?

राज्यातील सरकार हे सत्ताधाऱ्यांमुळेच पडेल, हे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. हे सरकार आम्ही पाडणार आहोत, असे आम्ही कधीही म्हटलेले नाही, परंतु माध्यमातून त्यासाठीचे मत बनवण्यात आले. हा आमच्यावर अन्याय आहे.

काँग्रेसला किंमत नाही

तीन पक्षांच्या सरकारमध्ये काँग्रेसला किंमत नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचेच सरकारमध्ये चालते. त्यामुळे एकमेकांवर दबाव आणण्यासाठी ते भाजपसोबत जातील, असे चित्र निर्माण करतात. आम्ही खूप कमी काळ सत्तेत राहिलो. आमचा पिंडच विरोधी पक्षाचा आहे. त्यामुळे आम्ही लोकांसाठी काम करतो. आम्ही विरोधी पक्षाच्या भूमिकेत कायम होतो.

शाळा सुरू करण्यावर गोंधळ

शाळा सुरू करताना त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन कळलेला नाही. ज्यांना लस उपलब्ध आहे, त्यांचे कॉलेज सुरू करायची नाही आणि ज्यांना लस नाही अशा मुलांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्‍या. शिक्षण थांबवावे असे आमचे म्हणणे नाही, पण त्यासाठी सुसूत्रीपणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन नाही, ही मोठी चिंतेची बाब आहे.

किरीट सोमय्या ठरवून दिलेले काम करताहेत...

किरीट सोमय्या हे त्यांचे काम करत आहेत. मी मला दिलेले काम करतो. राजकारणात काम करताना मी व्यक्तिश: कोणाबद्दल आणि परिवाराबद्दल बोलणार नाही; मात्र काहींची कार्यपद्धती वेगळी असते. किरीट सोमय्या हे जे करत आहेत, तेही कोणी तरी केले पाहिजे. त्याचा पक्षालाच फायदा होतो. माझ्यावर वैयक्तिक टीका केली तरी त्याला मी उत्तर देत नाही.

राजभवन सक्रिय

राज्य सरकार सक्रिय नाही, यामुळे राजभवन अॅक्टिव आहे. राज्यपाल कायद्यानुसार काम करत आहेत. त्याच पद्धतीने ते राज्यपालनियुक्त आमदारांच्या निवडीचा प्रश्न सोडवतील.

loading image
go to top