"जूनपासून पगार नाही" म्हणत पगारासाठी नेस्को कोविड केंद्रातील डॉक्टरांचा संताप

भाग्यश्री भुवड
Saturday, 7 November 2020

एका डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'माझा पगार एक लाख आहे, परंतु जूनपासून मला पगार मिळालेला नाही

मुंबई, 07: गोरेगावच्या नेस्को कोविड केअर केंद्रातील  कंत्राट पद्धतीने कार्यरत असलेल्या 137 खासगी डॉक्टरांचा पगार रखडला असल्याने डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी आहे. जुन महिन्यापासून पगार मिळाला नसल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. मात्र, प्रशासनाने हा आरोप फेटाळून लावला असून लवकरच पगार होतील असे आश्वासन दिले आहे. 

सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी नेस्कोमध्ये शेकडो खासगी डॉक्टरांची नेमणूक पालिकेतर्फे केली आहे. बीएचएमएसचे डॉक्टरही यात सामील आहेत. बीएचएमएस डॉक्टरांना 60,000, एमबीबीएस डॉक्टरांना 80,000 आणि तज्ज्ञ डॉक्टरांना एक लाख रुपये पगार देण्यात येत आहेत.  मात्र, जूनपासून त्यांना मोबदला मिळाला नाही, असा आरोप केंद्राच्या 137 डॉक्टरांनी केला आहे. 

महत्त्वाची बातमी : जेलमध्ये राहणार की मिळणार बेल? अर्णब यांच्याबाबतचा फैसला आज होण्याची शक्यता

एका डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'माझा पगार एक लाख आहे, परंतु जूनपासून मला पगार मिळालेला नाही. आम्ही पगारासाठी उच्च अधिकाऱ्यांशी बर्‍याच वेळा बोललो, पण कोणीही आमचे ऐकत नाही. 

एमबीबीएस डॉक्टर म्हणाले, 'जूनपासून मला पगार मिळालेला नाही. मी दोन वेळा माझे क्लिनिक चालवत होतो. परंतु कोविड केअर सेंटरमध्ये माझी नेमणूक झाल्यानंतर, नेस्को केंद्रात काम केल्यानंतर, मी एकदा क्लिनिकला जातो जेणेकरून मी घर चालवू शकेन. 

नेस्को कोविड केअर केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले की, डॉक्टरांनी केलेले आरोप खरे नाहीत. आम्ही सप्टेंबरपर्यंत जवळपास 90 टक्के डॉक्टरांचे वेतन दिले आहे, इतरही पगाराच्या प्रक्रियेत आहेत. आठवड्याभरात ऑक्टोबरचाही डॉक्टरांना पगार मिळेल. मी स्वत: या प्रकरणात लक्ष देत आहे. हळूहळू सर्वांचे पगार वेळेवर होतील. बँकेच्या7 दिवसांच्या कार्यकाळात ही प्रक्रिया होईल.

( संपादन - सुमित बागुल )

no salaries from june doctors of nesco covid centers annoyed on BMC


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no salaries from june doctors of nesco covid centers annoyed on BMC