आता चिकनगुनियाने धडकीIPatients | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिकनगुनिया

आता चिकनगुनियाने धडकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : चार वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात चिकनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येत ७८.७५ टक्के वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार २०१८ मध्ये चिकनगुनियाचे १,०२६ रुग्ण होते, १३ ऑक्टोबरपर्यंत ते १,८३४ वर पोहोचले आहेत. २०१९ आणि २०२० मध्ये अनुक्रमे २९८ आणि ७८२ रुग्णांची संख्या नोंदली गेली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार चिकनगुनियाचे रुग्ण वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. अवेळी आणि अधिकच्या पडलेल्या पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले होते. शिवाय तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ पडणारा पाऊस कारणीभूत ठरला आहे.

हेही वाचा: जम्मू काश्मीरमध्ये लष्कराची मोठी मोहिम; ११ दहशतवाद्यांना कंठस्नान

राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्या म्हणण्यानुसार, आकडेवारीनुसार डेंगी आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. दीर्घकाळ पडलेला पाऊस त्याचे एक कारण आहे. मात्र, ही बाब आपण टाळू शकत नाही. नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. प्रशासनाला सहकार्य करा आणि आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करा.

ताप, पुरळ, डोकेदुखी आणि मळमळ अशा तक्रारी असलेल्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. चिकनगुनियाचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे सांध्यातील तीव्र वेदना. रुग्णाला जास्त ताप आणि तीव्र सांधेदुखी जाणवते. त्यांना हालचाल करणे कठीण होते. शिवाय चिकनगुनियाची बहुतेक लक्षणे कोविड आणि डेंगीसारखीच असतात. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा रुग्णांत वाढ झाली असल्याचे खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी सांगितले.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, डासांची घरातील पैदास रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे.

मुंबईत ३० रुग्णांवर उपचार

मुंबई महापालिकेने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत १ जानेवारी ते १० ऑक्टोबरपर्यंत चिकनगुनियाच्या ३० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एकट्या ऑक्टोबर महिन्याच्या १० तारखेपर्यंत १० रुग्ण नोंदले गेले आहेत. मुंबईत याआधी २०१९ आणि २०२० मध्ये एकाही चिकनगुनियाच्या रुग्णाची नोंद झालेली नाही.

loading image
go to top