आता टिएमटीच्या बसमध्ये भरणार शाळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

महापालिकेच्या वतीने शाळाबाहय मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाच त्यांच्या दारात नेण्यासाठी नवा उपक्रम राबविला जाणार आहे.

ठाणे :  महापालिकेच्या वतीने शाळाबाहय मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाच त्यांच्या दारात नेण्यासाठी नवा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी टिएमटीच्या वापरात नसलेल्या भंगार बसेसची डागडूजी करुन या बसेसमध्ये शाळांचे वर्ग भरविले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात किमान पहिली आणि दुसरीच्या मुलांसाठी ही शाळा भरवली जाणार आहे. 

शहरातील शाळाबाह्‌य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण मंडळाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी महापालिकेच्या पाठींब्याने सिग्नल शाळा सुरु करण्यात आलेली आहे. त्यानुसार सिग्नल परिसरात भीग मागून राहणाऱ्या मुलांना या शाळेत शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. त्यानंतर आता टिएमटीच्या भंगार बसेसमध्ये शाळा भरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मानपाडा येथील तुर्फेपाडा परिसरात दोन भंगार बसमध्ये भाग शाळा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. येथे झोपडपट्टी विभाग मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरातील मुलांना शाळेची गोडी लागण्यासाठी पहिल्या टप्प्यात पुर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतची शाळा भरविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी महापालिकेकडून चोवीस लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. 
आजच्या घडीला महापालिकेच्या शिक्षण मंडळाक़डून शहरात चालविण्यात येणाऱ्या दिडशे शाळांमध्ये सुमारे पस्तीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

ही बातमी वाचा- पालिका शाळेच्या विद्यार्थ्यांची कमाल... रोबोला '"बाहु"'बल
मराठी, हिंदी, उर्दु, गुजराती आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा महापालिकेकडून चालविल्या जात आहेत. यामध्ये बालवाडी ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जात आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने ही संख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर शाळा बाह्‌य मुलांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळा आपल्या दारीच्या माध्यमातून विभागीय शाळा हा उपक्रम राबविला जाणार आहे.मानपाडा येथील आझादनगर परिसरामध्ये महापालिकेच्य वतीने प्राथमिक भरविण्यात येते. या शाळेत धर्माचा पाडा, ब्रह्मांड, तुर्फेपाडा तसेच आसपासच्या परिसरातील मुले शिक्षण घेतात. या भागातील शाळाबाह्‌य मुलांना तसेच अर्धवट शिक्षण सोडलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम महापालिकेने सुरु केले आहे. 

शाळा होणार घराजवळ 
मुलांच्या घरापासून आझादनगर शाळेचे अंतर जास्त असल्यामुळे अनेक विद्यार्थी शाळेत येणे टाळत आहेत. अशावेळी घराजवळ शाळा उपलब्ध करुन देण्याची मागणी अनेक पालकांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे केली होती. या परिसरात नवीन शाळेची इमारत उभारण्यासाठी कोटयवधी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामूळे टिएमटीच्या भंगार बसचे शाळेत रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार करून तो सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे सादर केला आहे. या प्रस्तावानुसार शाळेसाठी तुर्फेपाडा येथील पालिकेच्या राखीव भुखंडावर बांधकाम विभागाकडून शेड आणि तारेचे कुंपन उभारण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी बसेसची डागडूजी करुन त्यांना वर्गखोल्याचे रुप दिले जाणार आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the school will fill the bus with TMT