
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत विद्यार्थांना डिजिटल शिक्षण देण्यात येईल. या पद्धतीचा लाभ उच्च आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलांनाच होईल, मात्र स्थलांतरित झालेली लाखो मुले शिक्षणापासून वंचित राहून शाळाबाह्य ठरण्याची भीती शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
केंद्र सरकारने शाळा जुलैपर्यंत बंद ठेवण्यास सांगितले आहे. त्यानंतरही राज्य सरकारने 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी डिजिटल, टीव्ही आणि रेडिओ या माध्यमांचा आधार घेण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागात शाळा सुरू करण्याचे ठरवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो मजूर मूळ राज्यांत निघून गेले आहेत. राज्य सरकारने सुमारे 12 लाख मजुरांना त्यांच्या राज्यांत पाठवले आहे. अनेक मजूर मिळेल त्या वाहनांतून आणि पायपीट करत मूळ गावी पोहोचले आहेत. या मजुरांची मुले राज्यातील वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. रोजगार गेल्याने या मजुरांनी गावाची वाट धरली. कोरोनाचे संकट आणि दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या मजुरांना मुलांना डिजिटल शिक्षणाने आणखी संकटात टाकले आहे.
अनेक मजुरांकडे स्मार्टफोन असले तरी इंटरनेटची सुविधा नाही. गावी नेटवर्क नसल्याने मुलांना कसे शिक्षण द्यायचे, हा प्रश्न पालकांना पडला आहे. कोरोनानंतर जनजीवन सुरळीत झाल्यावर गावी गेलेले मजूर पुन्हा कामासाठी शहरात येतील, पण कुटुंबाला सोबत आणतील की नाही, याची शंका आहे. त्यामुळे राज्यात शिक्षण घेत असलेली अनेक मुले शाळाबाह्य होण्याची भीती शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. सरकारने डिजिटल शिक्षण देण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रथम लॅपटॉप, टॅब ही साधने द्यायला हवीत. गोरगरीब पालकांकडे अशी साधने नसल्याने मुले डिजिटल शिक्षणापासून वंचित राहतील व ती इतर विद्यार्थांच्या तुलनेत मागे पडतील. त्यातून शाळाबाह्य मुलांचे प्रमाण वाढेल, असे सामाजिक कार्यकर्ते संतोष गांगुर्डे यांनी सांगितले.
आरटीई प्रवेशाची मुदत वाढवावी
कोरोनामुळे वेगवेगळ्या राज्यांतील मजूर मूळ गावी परतले आहेत. या मजुरांची मुलेच शिक्षण हक्क कायद्यानुसार राबवण्यात येणाऱ्या प्रक्रियेतून प्रवेश घेतात. यंदा आरटीई सोडत झाली असली, तरी अनेकांनी प्रवेश निश्चित केलेले नाहीत. त्यातच लाखो लोक गावी गेल्याने यंदा आरटीई प्रवेशातील मुले शाळांत उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासाठी महिनाभर मुदत द्यावी, अशी मागणी हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.