esakal | लठ्ठ व्यक्तींना संसर्गाचा धोका अधिक, अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक
sakal

बोलून बातमी शोधा

लठ्ठ व्यक्तींना संसर्गाचा धोका अधिक, अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक

लठ्ठ व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याकारणाने अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकिय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

लठ्ठ व्यक्तींना संसर्गाचा धोका अधिक, अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: लठ्ठ व्यक्तींना कोरोना संसर्गाचा धोका अधिक असल्याकारणाने अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकिय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 
शारीरिक स्थूलता किंवा वजन प्रमाणापेक्षा जास्त असल्यास विविध जीवनशैलीशी निगडित आजार होण्याची शक्यता असते. वैज्ञानिक दृष्ट्या हे सिद्ध झालेले आहे. पण, आता लठ्ठपणामुळे कोरोनाचा धोकाही वाढतोय. लठ्ठ व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे एखाद्या विषाणूचा संसर्ग झाल्यास त्यांना सहजासहजी त्या विषाणूला परतवून लावता येत नाही. 

अतिलठ्ठ व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्यास गुंतागुंत अधिकच वाढू शकते. त्यामुळे कुठल्याही व्हायरसचा संसर्ग होऊ नये, यासाठी लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी आपले वजन कमी करणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचे संरक्षण करता येईल असे सैफी रुग्णालयाच्या बॅरिअॅट्रीक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितले आहे.

2020 या वर्षात कोविड-19 या व्हायरसचा सर्वांधिक धोका हा लठ्ठ व्यक्तींना जास्त असल्याचे विविध अहवालावरून समोर आले आहे. आतापर्यंत जेवढे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत त्यातील अधिकतर रूग्ण हे लठ्ठ होते. 

स्थूलतेमुळे टाईप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचा रोग, आणि रक्त गोठणे यांसारख्या समस्या उद्भवतात. याशिवाय फुफ्फुसावरही लठ्ठपणामुळे परिणाम होतो. तसेच, लठ्ठ व्यक्तीच्या शरीरात या विषाणूशी लढण्यासाठी पुरेशी शक्ती नसल्याने आजार वाढू शकतो. अशा स्थितीत बऱ्याच रूग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार द्यावे लागतात.

हेही वाचा-  सणासुदीत वाहनविक्रीत वाढ; पण पुढील चित्र अर्थव्यवस्थेवर अवलंबून

कोरोनातून बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनाबाधितांचा आकडाही वाढतोय. त्यामुळे कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी वाढत्या वजनावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) तपासून घेणं गरजेचं आहे. 

लठ्ठ व्यक्तींनी अतिरिक्त सावधगिरी बाळगणे गरजेचे

  • शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करणे ही काळजी गरजेचं आहे. तसेच दररोज संतुलित आहार घ्यावा.
  • तणाव कमी व्हावा, यासाठी दररोज सात ते आठ तास पुरेशी झोप घ्या. वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • पौष्टिक आहार न घेणं, अपुरी झोप, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव ही लठ्ठपणा वाढीस लावणारी चार प्रमुख कारण आहेत. परंतु, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाद्वारे लठ्ठपणा कमी करता येऊ शकतो.
  • लठ्ठपणा हा एक आजार असून तो अतिशय गांभीर्याने घेतला पाहिजे. वजन कमी करण्यासाठी बँरिअट्रिक सर्जनचा सल्ला घेतला पाहिजे. 

टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयरोग आणि पीसीओएस, फुफ्फुसाशी संबंधित आजार आणि यकृत रोग यांसारख्या अनेक संबंधित आजारांचे मूळ कारण लठ्ठपणा आहे. मुळात, लठ्ठपणा कमी करून घेण्यासाठी बँरिअट्रिक शस्त्रक्रिया हा एकमेव प्रभावी पर्याय आहे.

मुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लठ्ठपणा ही अशी अवस्था आहे ज्यात शरीरातील अन्य अवयवांवर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळीच उपाययोजना करणं गरजेचं आहे. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. याशिवाय लठ्ठ व्यक्तींनी कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्यासाठी हातपाय धुणे, मास्क लावणे आणि सामाजिक अंतर या नियमावलीचे पालन करणे गरजेचं आहे.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Obese people at higher risk of Corona infection medical experts

loading image
go to top