प्रजासत्ताकदिनी अवतरणार सुरांचा ‘हिंदी महासागर’!

प्रजासत्ताकदिनी अवतरणार सुरांचा ‘हिंदी महासागर’!

मुंबई : सगळीकडून नकारात्मकतेचे रडके सूर कानावर येत आहेत. महागाई, बेरोजगारी, सामाजिक अस्वास्थ्य अशा प्रश्‍नांचे मळभ संपूर्ण देशावर दाटून आले आहे. अशा काळात मनामनांत जीवनआशेचा ‘इंडियन ओशन’ जागवणारा एक संगीतमय कार्यक्रम आपल्या भेटीस येत आहे. येत्या रविवारी, प्रजासत्ताक दिनाच्या सायंकाळी ‘इंडियन ओशन’ या रॉक बॅण्डच्या सूरमयी लाटांवर स्वार होण्याची संधी आपणास लाभणार आहे. ही आहे ‘सकाळ’च्या वर्धापन दिनाची खास भेट.

नवी दिल्लीत १९९० मध्ये स्थापन झालेला हा सुप्रसिद्ध रॉक बॅण्ड ओळखला जातो लोकसंगीत आणि रॉक संगीत यांच्या अनोख्या ‘फ्युजन’साठी. संस्कृत श्‍लोक, सुफी गीते येथपासून भारतीय लोकसंगीत यांना बदलत्या सामाजिक- राजकीय रंगात घोळवून, त्यांना पाश्‍चात्य सुरावटीचा साज चढवणारा हा बॅण्ड आज देशभरातील महाविद्यालयीन तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेला आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून पीएच.डी. संपादन केलेले राहुल राम (बास गिटारिस्ट आणि गायक) तसेच मूळचे अभियंता असलेले निखिल राव (लीड गिटारिस्ट), अमित किलम (ड्रम वादक आणि गायक), हिमांशू जोशी आणि तुहीन चक्रवर्ती (परक्‍युशनिस्ट) हे या बॅण्डचे सदस्य.

इंडियन ओशन, डेझर्ट रेन, ब्लॅक फ्रायडे हे काही त्यांचे गाजलेले गीतसंग्रह (अल्बम) असून, या बॅण्डने ब्लॅक फ्रायडे, हल्ला, भूमी, गुलाल, मुंबई कटिंग, पीपली लाईव्ह, सत्याग्रह तसेच मसान यांसारख्या चित्रपटांनाही आपल्या सुरांनी सजवले आहे. आजच्या तरुणाईचा आवाज असलेला, सामाजिक- राजकीय मुद्द्यांवर न डरता भूमिका घेणारा आणि देशाच्या मातीशी इमान असलेला हा बॅण्ड अनुभवण्याची, त्याच्या सूरसागरात बुडून जाण्याची संधी, तीही आपल्या दारात, खारघर येथील सुप्रसिद्ध सेंट्रल पार्कमधील ॲम्फी थिएटरमध्ये... म्हणजे पर्वणीच. ती साधायलाच हवी.

होप ऑफ लाईफ
यंदाचा ‘सकाळ’चा वर्धापनदिन अधिकच खास आहे. याचे कारण म्हणजे यंदा ‘सकाळ’ची मुंबई आवृत्ती सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षाची ‘थीम’ आहे होप ऑफ लाईफ. समाजाच्या आरोग्यासाठी, एकंदर ‘वेलनेस’साठी वृत्तपत्रीय लेखनासोबतच विविध उपक्रमांद्वारे ‘सकाळ’ सातत्याने प्रयत्नशील आहे. यापूर्वी प्लास्टिक बंदी, अवयवदान, हृदयरोगाबाबत जागृतीचा ‘आर्ट ऑफ हार्ट’ असे वार्षिक उपक्रम ‘सकाळ’ने यशस्वीरीत्या पार पाडले. याच माळेतील यंदाचा उपक्रम आहे कर्करोगविषयक जनजागृती करतानाच कर्करोगाची शिकार बनलेल्या व्यक्तींना, त्यांच्या आप्तांना आधार देण्याचा. ‘देअर इज ऑल्वेज ए होप’- आशा नेहमीच जिवंत असते- हे पटवून देत त्यांना जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी देणाऱ्या या उपक्रमाचा प्रारंभ ‘इंडियन ओशन’ या रॉक बॅण्डच्या साथीने करण्यात  येत आहे.
 

इंडियन ओशन
कधी  : रविवार, २६ जानेवारी
वेळ : सायंकाळी ६.००
स्थळ : ॲम्फी थिएटर, सेंट्रल पार्क, खारघर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com