खातेवाटप न झाल्याने वाढतेय मंत्रालयातील फाईल्सची संख्या..

खातेवाटप न झाल्याने वाढतेय मंत्रालयातील फाईल्सची संख्या..

मुंबई : महाराष्ट्रात सोमवारी 36 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप महाराष्ट्रात कोणता मंत्री कोणतं खाते सांभाळणार यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. काल अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत खातेवातापाचा तिढा सुटलेला आहे असं सांगितलं. मात्र अधिकृतरित्या याबद्दल महाविकास आघाडीकडून सांगण्यात आलेलं नाही.     

मात्र खातेवाटप न झाल्याने त्याचा फटका सरकारी कामकाजावर होताना पाहायला मिळतोय. दररोजचं काम संथ गतीने सुरु असल्याने दिवसागणिक फाईल्सची संख्या वाढताना पाहायला मिळतेय. याचसोबत अनेक अधिकारी देखील बदली होईल याच्या भीतीने शांत असल्याचं सूत्रांकडून समजतंय.   

महाराष्ट्रात पार पडलेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारत 36 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मात्र अद्याप खात्यांचं वाटप करण्यात आलेलं नाही. महाविकास आघातीतील शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्याकडून खातेवाटपासाठी होणाऱ्या विलंबामुळे सरकारी कामकाजावर याचा परिणाम होतोय. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदभरती देखील बाकी आहे. त्यामुळे कामं बाकी असलेल्या फाईल्सची संख्या वाढतेय.  

यामध्ये सामान्य प्रशासन विभागासह इतर विभागातील अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यासह विविध प्रस्तावांशी संबंधित फाईल्स आहेत. मुख्यमंत्री सचिवालयात एकूण 146 पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र मुख्यमंत्री कार्यालयातील सह सचिव, उप सचिव, अवर सचिव, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक, ऑफिसर्स ऑन स्पेशल ड्युटी  म्हणजेच OSD याचसोबत कक्ष अधिकारी यांच्यासारखी पद भरणं बाकी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयात येणाऱ्या फाईल्स पटपट पुढे सरकत नाहीयेत.  

अधिकाऱ्यांवर टांगती तालावर

नवीन सरकार आल्यानंतर अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बदल्यांचा सामना करावा लागतो. अद्याप मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेलं नाही. म्हणून अधिकारी देखील सध्या शांत आहेत. मात्र यामुळे रोजच्या कामकाजावर परिणाम होताना पाहायला मिळतोय.  

चार महिन्यांपासून ठप्प आहे कामकाज 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता 21 सप्टेंबर रोजी लागू झाली. 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात मतदान पार पडलं, त्यानंतर 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकांचा निकाल लागला. मात्र निकालानंतर लगेच सरकार स्थापन झालं नाही. यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा सुरु होती. यामध्ये अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रात 80 तासांचं सरकार आलं होतं.   

यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं. 28 तारखेला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर तब्बल महिनाभरानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये 36 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जर अशाच संथ गतीने सरकारी कामकाज सुरु राहिलं तर प्रलंबित कामाचा बोजा दिवसागणित वाढत जाईल. 

WebTitle : official work on mantralaya is on halt since last four moths affecting day to day work of citizens

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com