esakal | Dombivli : निर्माल्यात टाकले जातेय जुने कपडे, प्लास्टिक..
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

Dombivli : निर्माल्यात टाकले जातेय जुने कपडे, प्लास्टिक..

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानच्या वतीने एमआयडिसीत निर्माल्य खत प्रकल्प राबविला जातो. त्यासाठी गणेश मंदिर आवारात निर्माल्य गोळा केले जाते. मात्र गेल्या महिन्याभरापासून या निर्माल्यात प्लास्टिक, जुने कपडे, कुजलेला कचरा नागरिकांकडून टाकला जात आहे. सूचना देऊनही नागरिक ऐकत नसल्याने अखेर संस्थानने पालिका प्रशासनाची मदत घेत प्लास्टिक टाकणाऱ्या नागरिकांना दंड ठोठावण्यास सुरवात केली आहे.

गणेश मंदिर संस्थानच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून निर्माल्य खत प्रकल्प राबविला जात आहे. या खत प्रकल्पात दररोज सुमारे 800 किलोच्या आसपास निर्माल्यावर प्रक्रिया केली जाते. श्री गणेश मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांमधील निर्माल्य जमा करून या खत प्रकल्पात प्रक्रियेसाठी आणले जाते. वर्षभराच्या कालावधीत सुमारे 60 टन निर्माल्य खत या प्रकल्पात तयार केले जाते. श्री गणेश मंदिर संस्थान येथे निर्माल्य गोळा केले जात असून 3 टेम्पो निर्माल्य गोळा केले जाते.

मात्र महिन्याभरापासून या निर्माल्यात काही नागरिक प्लास्टिक पिशव्या, जुने कपडे, कुजलेला कचरा टाकत आहेत. नागरिकांना वारंवार सूचना करूनही नागरिक कचरा टाकत आहेत. विनंती करूनसुद्धा नागरिक ऐकत नसल्याने प्लॅस्टीकची पिशवी व जुने कपडे टाकत असतांना आढळल्यास महापालिकेकडून दंड झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असा सूचनाफलक संस्थानने लावला आहे. त्याकडेही दुर्लक्ष करीत, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत नागरिक कचरा टाकत आहेत.

हेही वाचा: सायरा बानू यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

अखेर संस्थानने कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाची मदत घेत निर्माल्यात प्लास्टिक टाकणाऱ्यां विरोधात दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांत 15 ते 16 नागरिकांना प्रत्येकी 300 रुपये दंड ठोठावण्यात आल्याचे स्वछतादूत निखत खान यांनी सांगितले. निर्माल्य गोळा करणारे सेवक कामगार पांडुरंग साळुंखे व दयानंद मेस्त्री म्हणाले कुजलेला कचरा निर्माल्यात जास्त येत असल्याने तो वेगळा करताना उलट्या, चक्कर येणे अशा आरोग्याच्या समस्या आम्हाला भेडसावत आहेत.

निर्माल्यात अतिरिक्त कचरा, कपडे, प्लास्टिक टाकले जात आहे. वारंवार विनंती करूनही नागरिक बेजबाबदार पणे वागत आहेत. अखेर पालिकेची मदत घेत प्लास्टिक टाकणाऱ्या नागरिकांना दंड ठोठावला जात आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली असून नागरिकांनी आम्हाला सहकार्य केले नाही तर आम्हाला उपक्रमाविषयी विचार करावा लागेल.

loading image
go to top