
इथे ओमिक्राॅन नाही का? मास्क कोण घालणार : एकनाथ शिंदे
डोंबिवली : कोरोना रुग्णांची संख्या (Cororna Patient) आटोक्यात असली तरी, ओमिक्राॅनचा प्रादुर्भाव (Omicron Variant) वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे एकीकडे नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करा, मास्क परिधान करा असा उपदेश करीत असताना दुसरीकडे शिवसैनिकच या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. शिळ गावातील शिवसेना (Shiv Sena) शाखेच्या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. त्यात नागरिकांनी मास्कही परिधान केलेले नव्हते की सोशल डिस्टसिंगचेही पालन कोणी करत नव्हते.
ही परिस्थिती पाहून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन सोहळ्या प्रसंगी शिवसैनिकांचेच कान पिळले. शिवसैनिकांना कोरोना अजूनही गेलेला नाही, नव्याने ओमिक्राॅनचा धोका वाढत असताना तुम्ही कोणीही मास्क का परिधान केलेले नाही असा खडे बोल शिवसैनिकांना त्यांनी सुनावले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करा असा सल्ला देखील दिला.
हेही वाचा: राज्यपालांचं पत्र आलं...'विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य'
गावागावात पक्षमजबुतीकरणाकडे शिवसेना पक्ष लक्ष देत आहे. शाखांच्या माध्यमातून गावातील, परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येते. शिळ गाव येथे पूर्वी शिवसेनेची शाखा होती. मात्र रस्ता रुंदीकरण कामात शिवसेना शाखा कार्यालय तोडण्यात आले होते. रस्त्याचे काम आता पूर्ण झाले असल्याने याठिकाणी शिवसेनेच्यावतीने शिळ गावा शाखा कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या शाखेचे उद्धाटन शनिवारी नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पंचायत समिती उपसभापती भरत भोईर, ठाणे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांसह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमाला नागरिकांसह शिवसैनिकांनी एकच गर्दी केलेली होती. ही गर्दी पाहून, त्यातल्या त्यात गर्दीतील एकाही माणसाने मास्क परिधान केलेले नसल्याने पालकमंत्री शिंदे यांनी शिवसैनिकांची कान उघडणी केली.
हेही वाचा: पुणे : पादचारी मार्गावरची गाडी उचला अन्यथा नोंदणी रद्द
येथे पूर्वी शाखा होती, रस्ता रुंदीकरणात ती तोडली. मात्र आता पूर्वीपेक्षा दुप्पट मोठी शाखा आता सुरु झाली आहे. त्याचा फायदा सर्व सामान्य नागरिकांना झाला पाहीजे. शिवसेना प्रमुखांच्या आर्शिवादाने धर्मवीर आनंद दिघे यांनी शिवसेना घराघरात, लोकांच्या मनात रुजविण्याचे काम केले. शहरी भागात प्रत्येक वार्डात, विभागात तर ग्रामीण भागातही प्रत्येक विभागात शाखा सुरु करण्याचे काम दिघे यांनी केले. या शाखेच्या शाखा म्हणजे आपले न्याय मंदिर आहे. या न्यायमंदिरात अडले नडलेले लोक आपले प्रश्न, समस्या घेऊन येतात.
विश्वास लोकांच्या मनात शिवसेना शाखांविषयी आहे तो वाढविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. लोकांना न्याय देणारी शाखा म्हणून याचा नावलौकिक झाला पाहीजे ही जबाबदारी स्थानिक पदाधिकाऱ्यांची आहे. असा मोलाचा सल्ला त्यांनी शिवसैनिकांना दिला. त्यानंतर पालकमंत्री शिंदे यांनी कोरोना लाटेविषयी सांगताना, नव्याने ओमिक्राॅन आलेला आहे, इथे आहे का नाही ? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर शिवसैनिकांनी ही गोष्ट हसण्यावारी नेली, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी आरोग्याची काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन करत असताना आपणच मास्क परिधान करत नाही तर कसे चालेल असे बोलून शिवसैनिकांचा कान पिळला.
हेही वाचा: इस्लामपूर पालिकेची सर्वसाधारण सभा गणपूर्तीअभावी रद्द
माजी आमदार सुभाष भोईर यांची अनुपस्थिती...
कल्याण ग्रामीण, दिवा भागात माजी आमदार सुभाष भोईर यांचाही एक वेगळा दबदबा आहे. शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमाला सध्या भोईर यांची अनुपस्थिती दिसून येते. मध्यतंरी भोईर यांनी स्वतः आपल्याला कोणत्याही कार्यक्रमाला बोलावले जात नाही असे सांगितले होते. शिळ गाव शाखा ही भोईर यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असताना देखील त्यांना या कार्यक्रमास निमंत्रित केले गेले नसल्याचे दिसून आहे. तसेच शाखेवर झळकवण्यात आलेल्या बॅनरवर देखील भोईर यांचा फोटो नसल्याची हलकीशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरु होती. भोईर यांना शिवसेनेकडून जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचेही कार्यकर्ते आपआपसात बोलत होते.