
Mumbai News : ऑन ड्युटी वाहतूक पोलीसाना शिवीगाळ धक्का बुक्की; दोघे अटकेत
मुंबई : ऑन ड्युटी वाहतूक पोलीसाना शिवीगाळ धक्का बुक्की केल्या प्रकरणी दोन आरोपींना घाटकोपर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. आरोपी प्रमोद शिंदे व संघमित्रा शिंदे यांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात फिर्यादी अंकुश हांडे मुंबई पोलिस दलातील वाहतूक विभागात कार्यरत आहे. आपले कर्तव्य बजावत असताना दोन्ही आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.
25 फेब्रुवारी शनिवारी रोजी रात्री 22.15 च्या सुमारास अंकुश हांडे हे असल्फा जंक्शन, घाटकोपर पश्चिमेला वाहतूकीचे नियमन करत होते. तेव्हा आरोपी प्रमोद दाजी शिंदे व संघमित्रा प्रमोद शिंदे हे दुचाकीवरून येत होते.

आरोपींच्या दुचाकीला नंबर प्लेट नसल्यामुळे आणि पोलीस तपासणी करत आहे हे पाहता त्यांनी दुचाकी विरूध्द दिशेने नेली. स्कुटी रस्त्याच्या विरूध्द बाजुने चालविल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. तात्काळ आरोपींना वाहन बाजुस घेण्याबाबत अंकुश हांडे यांनी बजावले.
त्यावर दोघांनी अरेरावीची व उध्दट भाषा वापरुन त्यांच्याशी वाद केला. तसेच आरोपी संघमित्र शिंदेने पोलीस कर्मचारी हांडे याच्या अंगावर धावून धक्का बुक्की केली. एवढंच नाही तर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला शीवीगाळ करत बघून घेण्याची धमकी देत ते पळून गेले.
शासकीय कर्मचाऱ्याचा कर्तव्यात जाणिपुर्वक अडथळा निर्माण केल्या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. घाटकोपर पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळी भेट देऊन तेथील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले. गुप्त वार्तादारांकडून आरोपीची ओळख आणि लोकेशन शोधून काढले. त्या प्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रविवारी संध्याकाळी दोन्ही आरोपींना अटक केली.