येथे मिळणार एका क्‍लिकवर बेडची संख्या, कोव्हिड रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा

सुजित गायकवाड
Monday, 24 August 2020

खाटा शिल्लक नसल्याचे कारण देऊन रुग्णांना भर्ती करून घेण्यास नकार देणे, खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांची फरफट होणे अशा प्रकारच्या तक्रारींवर नवी मुंबई महापालिकेने उपाय शोधला आहे. नागरिकांना घरबसल्या फक्त एका क्‍लिकवर शहरातील कोव्हिड 19 अधिग्रहीत रुग्णालयांतील खाटांची माहिती उपलब्ध केली आहे.

नवी मुंबई : खाटा शिल्लक नसल्याचे कारण देऊन रुग्णांना भर्ती करून घेण्यास नकार देणे, खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांची फरफट होणे अशा प्रकारच्या तक्रारींवर नवी मुंबई महापालिकेने उपाय शोधला आहे. नागरिकांना घरबसल्या फक्त एका क्‍लिकवर शहरातील कोव्हिड 19 अधिग्रहीत रुग्णालयांतील खाटांची माहिती उपलब्ध केली आहे. https://www.nmmchealthfacilities.com या लिंकवर रोजच्या रोज माहिती अद्ययावत होणार आहे. महापालिकेच्या या उपक्रमांमुळे रुग्णालयांचा खोटारडेपणा उघडकीस येणार आहे. 

मोठी बातमी : भीषण! महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली; ७० ते ८० रहिवासी ढिगार्!यात अडकल्याची भीती

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे महापालिकेने तरतूद केलेल्या रुग्णालयांव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना घेण्यास नकार देण्यासाठी सरसकट सर्वांकडूनच खाटा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. जबाबदारी ढकलून देण्याच्या या प्रवृत्तीमुळे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्व रुग्णालयांना त्यांच्याकडे असलेल्या खाटांची माहिती पालिकेला देणे अनिवार्य केले होते. या रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने तयार केलेल्या संकेतस्थळावर आता रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची माहिती रोजच्या रोज एका क्‍लिकवर मिळणार आहे. या संकेतस्थळावर कोव्हिड 19 वरील उपचारासाठी कोव्हिड केअर सेंटर (CCC), डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर (DCHC) व डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटल (DCH) अशी त्रिस्तरीय सुविधा नवी मुंबई पालिकेतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. या रुग्णालय सुविधांमध्ये कोणत्या रुग्णालयांमध्ये, कोणत्या प्रकारचे, किती बेड्‌स उपलब्ध आहेत, याची अद्ययावत माहिती नागरिकांना सहजपणे मिळणार आहे. 

महत्त्वाची बातमी : पनवेल बसपोर्टचा विकास वार्!यावर; अडीच वर्षांत कंत्राटदाराने केले तुटपुंजे काम

पालिकेतर्फे डॅशबोर्ड 
बेड्‌स उपलब्धतेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, याकरिता पालिकेतर्फे "रिअल टाईम अपडेट डॅशबोर्ड' तयार केला आहे. त्याद्वारे पालिका क्षेत्रातील कोव्हिड रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेले सर्वसाधारण बेड्‌स, ऑक्‍सिजन बेड्‌स, आय.सी.यू. बेड्‌स, तसेच व्हेंटिलेटर याबाबतची रुग्णालयनिहाय अद्ययावत माहिती मिळणार आहे. या माहितीमुळे नागरिकांना सद्यस्थितीत कोणत्या रुग्णालयात, कोणत्या प्रकारचे, किती बेड्‌स उपलब्ध आहेत हे लगेच कळणार आहे. त्यामुळे बेड्‌स उपलब्धतेबाबतची माहिती मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.  

 
(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Click and get availble beds situation