esakal | धक्कादायक ! ''तुमची पेटीएम सेवा २४ तासात बंद होईल, आधी नमूद केलेल्या नंबरवर फोन करा''
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक ! ''तुमची पेटीएम सेवा २४ तासात बंद होईल, आधी नमूद केलेल्या नंबरवर फोन करा''

धक्कादायक ! ''तुमची पेटीएम सेवा २४ तासात बंद होईल, आधी नमूद केलेल्या नंबरवर फोन करा''

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : "केवायसी' न केल्यास पेटीएम (PayTm) सेवा बंद होईल, अशी भीती घालून भामट्यांनी काही जणांकडून लाखो रुपये लुबाडल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, फसवणूक झालेल्यांमध्ये डॉक्‍टर आणि पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

"केवायसी' न केल्यास पेटीएम सेवा 24 तासांत बंद होईल. त्यासाठी नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा', असा संदेश शीव येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. महावीर यादव यांना मिळाला. त्यानंतर डॉ. यादव यांनी कोणतीही खातरजमा न करता संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला.

मोठी बातमी - मुंबई महानगरपालिकेत ६८० कोटींचा पाणी घोटाळा

समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना एक लिंक पाठवून ती उघडण्यास सांगितले. त्या लिंकवर यादव यांनी क्‍लिक करताच मोबाईल किंवा संगणक परस्पर हाताळण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे ऍप डाऊनलोड झाले; मात्र त्याबाबत त्यांना कल्पनाही नव्हती. त्यांना पेटीएम खात्यात 50 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. ती रक्कम त्यांनी भरल्यावर थोड्याच वेळात त्यांच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने एक लाख रुपये काढून घेण्यात आले. 

गिरगाव येथे राहणारे आणि खासगी कंपनीत नोकरी करणारे अभिजित देसाई यांनाही अशाच प्रकारे गंडा घालण्यात आला. आपल्याला आलेला संदेश पेटीएमनेच पाठवल्याचे समजून त्यांनी "क्विक सपोर्ट' ऍप डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून 90 हजार रुपये गायब झाले. या प्रकरणांत गुन्हे दाखल केला असून, तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मोठी बातमी -  ग्रीन पोलिस हवेत! म्हणून ते गेलेत आदित्य ठाकरेंकडे..

पोलिसाला ऑनलाईन खरेदी महागात 

राज्य पोलिस दलात शिपाई असलेले हेमंत सातर्डेकर यांनी ऑनलाईन संकेतस्थळावरून मनगटी घड्याळ मागवले. घरपोच मिळालेल्या घड्याळात बिघाड असल्याचे आढळल्यामुळे त्यांनी ते परत केले. परंतु आधीच भरलेले पैसे त्यांना परत मिळाले नव्हते. त्यासाठी त्यांनी संबंधित संकेतस्थळाच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला. दूरध्वनीवर बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांच्याकडून कार्ड क्रमांक आणि ओटीपी असा तपशील मागून घेतला. त्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यातून 70 हजार रुपये काढून घेण्यात आले.  
 

loading image