मुंबई महानगरपालिकेत ६८० कोटींचा पाणी घोटाळा

मुंबई महानगरपालिकेत ६८० कोटींचा पाणी घोटाळा

मुंबई -  पिण्याच्या पाण्याचा 680 कोटी रुपयांचा घोटाळा आज पालिकेच्या महासभेत उघड झाला. मुंबई पोर्टट्रस्ट परिसरातील बंदरांमध्ये लागणाऱ्या बोटी धुण्यासाठी गेल्या 17 वर्षांपासून दररोज दहा लाख लिटर पाणी बेकायदेशीररित्या महापालिकेचे दोन अभियंते देत असल्याचा खळबळजनक आरोप आज पालिकेच्या महासभेत झाला. 680 कोटी रुपयांच्या पाणी चोरी प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षानेही केली. दोन अभियंत्यांची पदोन्नती रोखण्यात आली. 

स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंगळवारी पालिका सभागृहात 680 कोटी रुपयांचा पाणी घोटाळा उजेडात आणला. या पाणीचोरीमुळे पालिकेचा 680 कोटींचा महसूल बुडाल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली. अशा अधिकाऱ्यांच्या बढतीचा प्रस्ताव आणताच कसा? असा सवालही त्यानी केला. त्यामुळे पाणी चोरीचे हे प्रकरण आज सभागृहात चांगलेच गाजले. त्यामुळे या दोन अधिकाऱ्यांच्या बढतीवर गंडांतर आले आहे. 

संजय महादेव जाधव, बाबासाहेब महादेव साळवे, अजय सुरेंद्रनाथ राठोर, अरूण भिवा भोईर आणि विवेक रघुनाथ मोरे हे पालिकेत उप प्रमुख अभियंता (स्थापत्य व अभियांत्रिकी गट) असून त्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार प्रमुख अभियंतापदी बढती मिळण्याचा प्रस्ताव आज पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी मांडला होता. या प्रस्तावावर स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बाबासाहेब साळवे आणि अजय राठोर यांना बढती देऊ नये, अशी उपसूचना मांडली. साळवे आणि राठोर हे शिवडी ते डॉकयार्ड रोड परिसरातील लकडा बंदर, रेती बंदर, कोळसा बंदर, कौला बंदर, घासलेट बंदर, हाजी बंदर या सहा बंदरांमध्ये लागणाऱ्या बोटी धुण्यासाठी संबंधित बोटींच्या मालकांना गेल्या 17 वर्षांपासून दररोज दहा लाख लिटर बेकायदेशीर पाणी देत असल्याचा आरोप जाधव यांनी केला.

या प्रकरणी त्यांच्यावर कारवाईची मागणी जाधव यांनी केली. या दोघांकडून लेखी खुलासा मागवावा, अशी मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी जाधव यांच्या उपसूचनेला पाठिंबा दिला. भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनीही अधिकाऱ्यांना निलंबित करून चौकशी करण्याची मागणी केली. त्यामुळे या प्रस्तावातील इतर तिघांच्या बढतीला मंजुरी देत साळवे आणि राठोर यांच्या बढत्या रोखण्याचा निर्णय सभागृहाने घेतला. 

पाणी चोरी प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची चौकशी करावी. अशा गैर व्यवहाराची चौकशी करूनच असे प्रस्ताव मंजूरीसाठी आणावेत. चौकशीचा अहवाल आल्यानंतरच त्या प्रस्तावावर निर्णय होईल.

- किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई महानगर पालिका 

water scam in mumbai municipal cororation worth rupees 680 crore 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com