किशोरवयीन तीन मुलांपैकी एक लठ्ठ!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

 चायनीज पदार्थ आणि इतर जंकफूडच्या आहारी गेलेल्या किशोरवयीन मुलांमध्ये वाढत चाललेला लठ्ठपणा डॉक्‍टरांसाठी चिंताजनक बनला आहे.

मुंबई - चायनीज पदार्थ आणि इतर जंकफूडच्या आहारी गेलेल्या किशोरवयीन मुलांमध्ये वाढत चाललेला लठ्ठपणा डॉक्‍टरांसाठी चिंताजनक बनला आहे. तीन किशोरवयीन मुलांपैकी एक लठ्ठ होत असल्याचे निरीक्षण डॉक्‍टरांनी नोंदवले आहे. वाढती स्थूलता मुलांना वेळेअगोदरच वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देत असून अशी पिढी वयाची पन्नाशी तरी गाठेल का, असा प्रश्‍न डॉक्‍टरांना सतावतो आहे. 

दहा वर्षांपूर्वी प्रत्येक पाच किशोरवयीन मुलांपैकी एक जण लठ्ठ आढळून येत होता; परंतु आता असा प्रकार तिघांपैकी एकामध्ये दिसून येत आहे. रोजच्या जेवणात भारतीय अन्नपदार्थ पूर्णपणे वर्ज्य झाले असून त्यांची जागा जंकफूडने घेतल्याने त्याचे विपरीत परिणाम किशोरवयीन मुलांमध्ये दिसून येत असल्याचे बॅरिॲट्रिक सर्जन डॉ. प्रशांत शाह सांगतात. १५ ते २१ वयोगटातील मुले याच वयात लठ्ठपणामुळे फारशी क्रियाशील नसल्याचे निरीक्षणही डॉ. शाह यांनी नोंदविले. अशा मुलांमध्ये स्नायूंची पूर्णपणे वाढच झालेली नसते. मैदानी खेळांचा अभाव आणि सततच्या बैठ्या जीवनशैलीमुळे त्यांच्या शरीराला व्यायाम मिळेनासा झाला आहे. अशी पिढी पंचविशीला येताच त्यांच्यात उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांचे निदान होत आहे. पंचविशीतच मधुमेहाचे निदान झाले तर स्नायू बळकट होण्याची शक्‍यता फारच कमी असते. त्यामुळे आताच्या तरुण पिढीने सकस आहाराकडे लक्ष द्यावे, असे आवाहन डॉ. शाह यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One of the three teenage boys is fat