संडे हो मंडे रोज खा अंडे नाही 'कांदे'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 February 2020

काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना रडवणाऱ्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सद्यस्थितीत तुर्कस्तानातून आयात केलेला कांदा सडू लागला आहे. त्यामुळे त्याला घाऊक बाजारात 5 ते 10 रुपये इतका निचांकी दर मिळत आहे.

नवी मुंबई : काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना रडवणाऱ्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सद्यस्थितीत तुर्कस्तानातून आयात केलेला कांदा सडू लागला आहे. त्यामुळे त्याला घाऊक बाजारात 5 ते 10 रुपये इतका निचांकी दर मिळत आहे; तर राज्यभरातून बाजार समितीत येणाऱ्या नवीन कांद्याला घाऊक बाजारात 20 ते 26 रुपये दर मिळत आहे. मागील आठवड्यात हाच कांदा 30 ते 35 रुपये दराने विकला जात होता. 

ही बातमी वाचली का? खुशखबर... निटको कामगारांना मोबदला मिळणार

या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले होते. परिणामस्वरूप, बाजारात तुटवडा निर्माण झाल्याने, कांद्याने शंभरी पार करत 120 ते 130 रुपये किलोपर्यत उसळी घेतली होती. मागणीइतका पुरवठा होत नसल्याने केंद्र सरकारने तुर्कस्तान, इजिप्तमधून मोठ्या प्रमाणात कांदा आयात केला होता. हा कांदा उरणच्या जेएनपीटी बंदरात ठेवण्यात आला होता. हॉटेल व्यावसायिकांकडून या कांद्याला मागणी होती. मात्र आता बाजारात नवीन कांद्याची आवक वाढू लागल्याने, दरात सरासरी 23 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात उन्हाळ दाखल होतो. परिणामी, आवक वाढून कांद्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्‍यता असल्याचे घाऊक व्यापारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? येथे मराठी माणसाला नोकरी मिळणार नाही
 
आयात कांद्याकडे पाठ 
नवीन कांद्याची आवक वाढल्याने आयात कांद्याची मागणी घटली आहे. त्यामुळे जेएनपीटीत सात हजार टन कांदा पडून आहे. तो सडू लागल्याने फेकून द्यावा लागत आहे. हा कांदा आकाराने मोठा असून, बेचव आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी त्याच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. 

दररोज 150 गाड्यांची आवक 
एपीएमसीच्या कांदा-बटाटा बाजारात सध्या दररोज 150 गाड्यांची आवक होत आहे. राज्यातील कांद्याला प्रति किलो 20 ते 26 रुपये भाव मिळत आहे; तर आयात कांद्याची मागणी कमी झाली असून, त्याला 5 ते 10 रुपये किलो दर मिळत आहे. 

बाजारात नवीन कांद्याची आवक वाढू लागल्याने, दरात सरासरी 23 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यत बाजारात उन्हाळ कांदा दाखल होईल. त्यामुळे आवक वाढून दरात आणखी घसरण होण्याची शक्‍यता आहे. 
- राजेंद्र शेळके, घाऊक व्यापारी. 

onion prices dropped in Vashi APMC market


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: onion prices dropped in Vashi APMC market