"इथे मराठी माणसाला नोकरी दिली जाणार नाही"

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

बेलापूर येथे जलवाहतूक करणाऱ्या एका कंपनीने कर्मचारी भरतीकरिता दिलेल्या जाहिरातीत महाराष्ट्रीयन तरुणांना मनाई केल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबई : बेलापूर येथे जलवाहतूक करणाऱ्या एका कंपनीने कर्मचारी भरतीकरिता दिलेल्या जाहिरातीत महाराष्ट्रीयन तरुणांना मनाई केल्याची घटना घडली आहे. या घटनेची दखल घेत मनसेच्या नवी मुंबईतील कार्यकर्त्यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन व्यवस्थापकांना जाब विचारला. मनसे कार्यकर्त्यांनी या कंपनीला धारेवर धरल्यानंतर संबंधित कंपनी व्यवस्थापनाने माफीनामा लिहून देत, जाहिरात मागे घेण्याचे आश्‍वासन दिले. 

ही बातमी वाचली का? ऐन लग्न सराईत फुले स्वस्त

सीबीडी-बेलापूर सेक्‍टर 11 येथे एका वाणिज्य संकुलात सेफ सेस या जलवाहतूक करणाऱ्या कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात कंपनीला प्रशासकीय कामांसाठी काही तरुणांची गरज होती. त्याकरिता कंपनीने एका वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती; मात्र जाहिरात देताना महाराष्ट्रीयन नसलेल्या तरुणांना पहिले प्राधान्य देण्यात येईल, असे ठळक अक्षरात नमूद केले होते. ही जाहिरात वर्तमानपत्रात येण्याआधीच समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे मराठी तरुणांकडून या जाहिरातीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. महाराष्ट्रात व्यवसाय करीत असताना मराठी तरुणांनाच प्राधान्य न देणाऱ्या या कंपनीचा समाजमाध्यमांवर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. 

ही बातमी वाचली का? सावधान! नवी मुंबईत डोक्यावर पडतायेत विजेचे खांब

याबाबत मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी तत्काळ दखल घेत कार्यकर्त्यांना कंपनीच्या कार्यालयात पाठवले. या कंपनीच्या व्यवस्थापकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठणकावल्यानंतर व्यवस्थापकांनी चुकून झाल्याचे सांगितले. तसेच यापुढे कंपनीत मराठी मुलांना नोकरीसाठी प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले. तसेच घडल्या प्रकाराबाबत कंपनीने मनसेच्या नावाने माफीनामा लिहून दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS blasts a company that refuses jobs for Marathi youth