मुसळधार पावसामुळे आवक घटल्याने कांदा महागणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पश्‍चिम महाराष्ट्रासह, नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे कांद्याची मुंबईपर्यंत होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. नाशिक जिल्ह्यात अरणींमध्ये पावसाचे पाणी साचून, कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांदा-बटाटा बाजारात मालाची आवक कमी-कमी होत आहे. परिणामी, मालाच्या दरात वाढ होत असून, यापुढे हे दर आणखी चढेच राहण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

नवी मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रासह, नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व रस्ते जलमय झाले आहेत. त्यामुळे कांद्याची मुंबईपर्यंत होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. नाशिक जिल्ह्यात अरणींमध्ये पावसाचे पाणी साचून, कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा या हंगामातील पन्नास टक्के कांदा पाण्यात अक्षरक्ष: बुडाला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कांदा-बटाटा बाजारात मालाची आवक कमी-कमी होत आहे. परिणामी, मालाच्या दरात वाढ होत असून, यापुढे हे दर आणखी चढेच राहण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

घाऊक कांदा-बटाटा बाजारात नाशिक, पुणे, जुन्नर, ओतूरमधून कांद्याची आवक होत असते. यात सर्वाधिक कांदा नाशिकमधून येतो. नेहमीची मागणी पूर्ण करण्यासाठी बाजारात दररोज सरासरी शंभर गाड्या कांद्याची आवश्‍यकता असते; मात्र सध्या ही आवक ७० गाड्यांपर्यंत खाली आली आहे. १५ ते १६ रुपये किलो असलेला कांदा १८ ते १९ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यातच आता कांद्याच्या अरणीत पावसाच्या पुराचे पाणी शिरल्याने कांदा सडल्याने, आता तो फेकून देण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. त्यामुळे यापुढे मुंबईला होणारा कांद्याचा पुरवठा आणखी कमी होण्याची शक्‍यता आहे.

बटाट्याच्याही ७० ते ८० गाड्या दररोज बाजारात येणे अपेक्षित असते. सध्या बाजारात सरासरी ६० गाड्या दाखल होत आहेत. त्यामुळे बाजारात बटाट्याचीही आवक कमी आहे. लसणाच्या चार-पाच गाड्या दररोज येतात. ही आवकही पुरेशी नाही. याशिवाय सध्या पावसामुळे बाजारात येणारा माल भिजलेला असल्याने तो जास्त काळ साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे बाजारात आल्यावर लगेचच त्याची विक्री करावी लागत आहे. बटाट्याचे दर ९ ते ११ रुपये किलो झाले आहेत. यापूर्वी कांद्याचे दर १० ते १२ रुपये होते; तर बटाटा ७ ते ८ रुपये किलो होता. लसूण घाऊक बाजारात ५० ते ८० रुपये किलो झाली होती. ती आता ५० ते १०० रुपये किलोपर्यंत आहे. 

उत्पादक क्षेत्रात होत असलेला पाऊस पाहता मालाची आवक अशीच होणार आहे. भिजलेला माल बाजारात येत असल्याने, व्यापाऱ्यांचे अधिक नुकसान होत आहे. त्यामुळे हा सर्व खर्च काढून मालाची किंमत मिळवण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांकडून होत आहे. येत्या काही दिवसांत मालाचे दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.
- मनोहर तोतलानी, व्यापारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion will be expensive due to heavy rains