esakal | ऑनलाईन औषध मागविणाऱ्या तरुणीला दीड लाख रुपयांना गंडा
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber ​​Crime

ऑनलाईन औषध मागविणाऱ्या तरुणीला दीड लाख रुपयांना गंडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : ऑनलाईन औषध मागविणे कोपरखैरणेतील २५ वर्षीय तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. तरुणीने मागितलेली औषधे घरपोच पाठविण्याचा बहाणा करून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने तरुणीकडून तब्बल दीड लाख रुपये उकळले आहेत. विशेष म्हणजे तरुणीने मागविलेले औषध बेकायदा असल्याचे सांगून तिलाच पोलिस तक्रारीची धमकी देत आरोपींनी ही रक्कम उकळल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील सायबर गुन्हेगारांवर कोपरखैरणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

तरुणीने १ सप्टेंबर रोजी एका संकेतस्थळावरून हे औषध मागवत आपला व्हॉट्स ॲप क्रमांक तिथे नोंदवला होता. त्यानंतर त्याच दिवशी मणिपूर ट्रेडर्स कंपनीचा सेल्स मॅनेजर साजिद हुसेन असल्याचे सांगून आरोपीने तरुणीशी संपर्क साधला. घरपोच औषध देण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली. तरुणीने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याला गुगल पेद्वारे ५ हजार रुपये पाठवले. त्यानंतर आरोपीने ट्रान्सपोर्टेशन व इतर कारणांसाठी आणखी दहा हजार रुपये तरुणीकडून उकळले. नंतर हे औषध बेकायदा असून ते पोलिसांनी पकडल्याचे सांगत हे प्रकरण मिटविण्यासाठी आरोपींनी पुन्हा २५ हजार रुपयांची मागणी करत रक्कम न दिल्यास तिचा पत्ता पोलिसांना देण्याची भीती दाखविली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने हे पैसे पाठवून दिले. त्यानंतर पोलिसांनी आम्हाला पकडले असून पोलिसांसोबत तिच्या घरी येत असल्याचे सांगून तरुणीला आणखी रक्कम पाठविण्यास भाग पाडण्यात आले. अशा पद्धतीने आरोपीने तरुणीकडून तब्बल दीड लाख रुपये उकळले.

हेही वाचा: मुंबई : अल्पवयीन मुलीवर बेशुद्धावस्थेत बलात्कार

आरोपींकडून तरुणीला भीती दाखवून आणखी पैसे पाठविण्याबाबत सांगण्यात येत असल्याने तरुणीने घडल्याप्रकाराची माहिती आपल्या मावशीला दिली. त्यानंतर मावशीने तिला सावध करून तिची फसवणूक करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणीने कोपरखैरणे पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सरू केला आहे.

loading image
go to top