मोठी बातमी! मुंबई, पुणे वगळता इतर विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा अशक्य; कुलगुरूंच्या समितीचा अहवाल सादर

तेजस वाघमारे
Sunday, 30 August 2020

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने आपला अहवाल तयार केला. या अहवालात मुंबई, पुणे विद्यापीठ वगळता इतर विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा घेणे अशक्य असल्याचे नमूद केले आहे.

मुंबई: अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नेमलेल्या समितीने आपला अहवाल तयार केला. या अहवालात मुंबई, पुणे विद्यापीठ वगळता इतर विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा घेणे अशक्य असल्याचे नमूद केले आहे. यासह विविध अडचणींवरही या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. अहवालातील याच मुद्यांवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली  रविवारी (ता. 30) बैठक पार पडली. या बैठकीत परीक्षेच्या प्रश्नांबाबत चर्चा झाली. हि समिती हा अहवाल सोमवारी (ता. 31) सरकारकडे सादर करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. तसेच राज्यपालांसोबतही याविषयी चर्चा तातडीने केली जाणार असल्याचे सामंत म्हणाले.

परीक्षा आयोजनाबाबत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता.29) समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने तयार केलेल्या अहवालावर ही बैठक पार पडली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला कुलगुरू समितीच्या सदस्यांसोबतच माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर तसेच माजी कुलगुरू डॉ. विजय खोले आधी निमंत्रित सदस्य म्हणून उपस्थित होते.

मास्क वापरणे बंधनकारक नसल्याचा तो व्हिडिओ चुकीचा; आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी कुलगुरूंच्या समितीने तयार केलेला अहवाल उद्या दुपारी बारा वाजता सरकारकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर या अहवालावर राज्यपालां सोबत चर्चा केली जाणार आहे. राज्यातील कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वच विद्यापीठांनी ऑफलाइन परीक्षा घेणे कठीण असल्याचे मत या अहवालात नोंदविण्यात आले आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि पुणे या दोन विद्यापीठ यांचा अपवाद वगळता राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नाही. त्यासाठीची यंत्रणा विद्यापीठांमध्ये उपलब्ध नाही. यामुळे अनेक अडचणींना सर्व विद्यापीठांना सामोरे जावे लागेल अशा प्रकारची एक भीती कुलगुरूंनी या अहवालाच्या माध्यमातून व्यक्त केली असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

हिवाळ्यात कोरोना रौद्ररुप घेणार; जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

मागील काही महिन्यात ग्रामीण भागात कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने याठिकाणी ऑफलाइन परीक्षा घेणे कठीण असल्याचे कुलगुरूंनी या अहवालात नमूद केले आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयानेच अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले असल्याने या परीक्षा कोणत्या परिस्थितीत घ्यावे लागणार आहेत त्यामुळे या परीक्षेसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना आखून त्या परीक्षा कशा घेता येथील यासाठीच्या अनेक शिफारशी कुलगुरूंच्या समितीने आपल्या अहवालात केल्या आहेत.

 

एका महिन्याची मूदतवाढ मागण्याची शिफारस
ऑनलाइन-ऑफलाइन दोन्ही पर्याय स्वीकारणार 

मुंबई : युजीसीने दिलेल्या 30 सप्टेंबरच्या मुदतीमध्ये परीक्षा घेणे अशक्य आहे. यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाकडे एका महिन्याची मूदतवाढ मागावी अशी शिफारस कुलगुरूंच्या समितीने केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासह अंतिम वर्षाची परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या आधारे घ्यावी तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन असे दोन्ही पर्याय द्यावेत अशी सुचना अंतिम वर्षाची परीक्षा कशी घ्यायची याबाबत सरकारने नेमलेल्या समितीने केली आहे. कुलगुरुंनी तयार केलेला हा अहवाल सोमवारी (ता.31) सरकारकडे सादर केला जाणार आहे. हा अहवाल सादर झाल्यानंतर तातडीने राज्यपालांसोबत तातडीने चर्चा करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online exams impossible in other universities except Mumbai, Pune; Report of the Committee of the Vice-Chancellor presented