मुंबईकरांची यशाच्या दिशेनं वाटचाल, धारावीत उरले केवळ 'इतके'च अॅक्टिव्ह रुग्ण

पूजा विचारे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

जुलै महिन्यात मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती समोर आली आहे. तर केवळ एकट्या जुलै महिन्यात मुंबईत ४९ टक्के कोरोना रुग्ण बरे झालेत.

मुंबईः मुंबईकरांना एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मुंबई कोरोनाचं केंद्र बनलं होतं. मात्र आता मुंबईकरांनी कोरोनासारख्या व्हायरसवर मात करत कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. जुलै महिन्यात मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची माहिती समोर आली आहे. तर केवळ एकट्या जुलै महिन्यात मुंबईत ४९ टक्के कोरोना रुग्ण बरे झालेत. तर एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीनंही कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल केली आहे.  सध्या धारावीत ७२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण उरलेत. 

जुलैमध्ये कोरोनाचे ३५ हजार ५७० नवे रुग्ण सापडलेत. मुंबईत १ जुलैला ७८ हजार ७०८ कोरोना रुग्ण होते. त्यापैकी ४४ हजार ७९१ रुग्ण बरे झालेत. जुलै महिन्यात २९ हजार २८८ एकूण अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा होता. त्यावेळी कोरोनाचा रिकव्हरी रेट ५७ टक्के होता. ३१ जुलैपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार २७८ झाली. कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या ८७  हजार ७४ वर पोहोचली होती. या प्रकारे जुलै महिन्यात मुंबईत कोरोनाचे ४२ हजार २८३ रुग्ण बरे झालेत. जुलैमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४८.५६ टक्के एवढा आहे. या काळात रिकव्हरी रेट ५७ ते ७७ टक्के इतका होता. कोरोनाचा रोजचा ग्रोथ रेट १.६८ ते ०.९१ टक्के होता. डबलिंग रेट ४२ दिवसांवरुन ७७ दिवस झाला आहे.

अधिक वाचाः  बहिणींनो काळजी करू नका; रक्षाबंधनसाठी रविवारीही पोस्टाची सेवा सुरू

धारावीत केवळ ७२ अॅक्टिव्ह रुग्ण 

धारावी हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र आता या भागात केवळ ७२ अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. शनिवारी धारावीत केवळ ४ रुग्ण आढळून आले. धारावीत आतापर्यंत २५६० रुग्ण सापडलेत. त्यापैकी २२३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती पालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. 

हेही वाचाः  अकरावी प्रवेश होणार घरबसल्या; प्रवेशासाठी महाविद्यालयात जाण्याची आवश्यकता नाही...वाचा सविस्तर बातमी

डबलिंग रेट ७२ दिवसांवर 

 मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा सरासरी दर आता १ टक्क्यापेक्षाही खाली आला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७२ दिवसांवर गेला आहे.  मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता ०.९७ टक्के इतका नोंदवला गेला आहे. त्यामुळे १ टक्क्याच्याही खाली हा दर आल्यानं मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरलीय.  मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांचा अभ्यास केला असता, एकूण १८ म्हणजे दोन तृतीयांश विभागांमध्ये १ टक्के किंवा त्यापेक्षा कमी रुग्णवाढ दर आहे. मुंबईत रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी देखील प्रथमच ७० च्यापार गेला आहे. हा सरासरी कालावधी आता ७२ दिवसांचा झाला आहे. 

Only 72 patients remained hotspot Dharavi Mumbai most patients recover July


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 72 patients remained hotspot Dharavi Mumbai most patients recover July