मी घरची धुणी रस्त्यावर धुवत नाही, फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

पूजा विचारे
Friday, 11 September 2020

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी एकनाथ खडसे, मराठा आरक्षण, कंगना राणावत अशा विविध विषयावर भाष्य केलं.

मुंबईः  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी एकनाथ खडसे, मराठा आरक्षण, कंगना राणावत अशा विविध विषयावर भाष्य केलं. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय दुर्दैवी असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच हा राज्याचा कायदा, केंद्र सरकारचा संबंध नाही, असंही सांगायला फडणवीस म्हणालेत. 

आरक्षण मुद्द्यावर राज्य सरकारनं लक्ष दिलं नसल्याचं फडणवीस म्हणालेत. तसंच राज्य सरकारनं तात्काळ सरन्यायाधीशांकडे जावं असा सल्लाही त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर सरकारनं बोध घेण्याची गरज असून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची रणनीती चुकली असंही ते म्हणालेत. 

घटनापीठ स्थगिती काढत नाही तोपर्यंत स्थगिती कायम असेल त्यामुळे आरक्षण लागू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.  मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. काही जणांकडून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असल्याचंही ते म्हणालेत. तसंच राज्य सरकारनं बाजू मांडण्यात कमी पडलो का याचा विचार करायला पाहिजे, असं फडणवीस यांनी सांगितलंय. 

सरकार कोरोनाऐवजी कंगनाविरोधात असा टोलाही फडणवीस ठाकरे सरकारला लगावला आहे. सरकारनं कंगना सोडून कोरोनाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. कंगनाचा मुद्दा भाजपनं उचलला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. 

यावेळी फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसेंना मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर MIDC जमीन खरेदीप्रकरणात राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावर गुन्हा माझ्यामुळे नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशान दाखल झाला. एकनाथ खडसेंनी गैरसमज पसरवू नये, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

Opposition leader Devendra Fadnavis reaction Maratha reservation


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition leader Devendra Fadnavis reaction Maratha reservation