सावधान, आज मुंबई, ठाणे, रायगडमध्ये जोरदार वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज

समीर सुर्वे
Thursday, 15 October 2020

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये जोरदार वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस होईल. काही भागात 200 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज.ऑरेंज अलर्ट जारी 

मुंबई : मुंबईसह संपुर्ण कोकणात आज म्हणजेच गुरुवारी पावसाचा जोर वाढणार आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होणार असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने मुंबई वेधशाळेने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तेलंगणामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तेलंगणामध्ये अतिवृष्टी होत असून मध्य महाराष्ट्रात सोलापूरसह काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील 12 तासात कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर कमी होणार असला तरी कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार आहे. तर पुढील काही दिवस समुद्रही खवळलेला राहाणार आहे. समुद्र किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किलोमिटर वेगाने वारे वाहाणार असून काही वेळ वाऱ्याचा वेग 60 किलोमिटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाची बातमी : देवेंद्र फडणवीसांना आणखीन एक मोठा धक्का, जलयुक्त शिवाराची SIT चौकशी होणार

मुंबईत काल संध्याकाळ पासून ढग दाटून येण्यास सुरुवात झाली. मेघगर्जना आणि विजेच्या लखलखटासह पावसाच्या काही सरी कोसळल्या. रात्रीपासून पावसाची रिपरीप सुरु झाली. मुंबईत संध्याकाळपर्यंत कुलाबा येथे कमाल 31.2 आणि किमान 26 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले. तर, सांताक्रुझ येथे कमाल 32.7 आणि किमान 25.5 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.

कोकणातील पावसाची शक्यता पाहाता नाविक दल, तटरक्षक दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण बल तसेच स्थानिक प्रशासनाला सतर्कतेचा आणि सज्जतेचा इशारा देण्यात आला.

orange alert in mumbai thane raigad heavy to very heavy rains are expected by IMD


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: orange alert in mumbai thane raigad heavy to very heavy rains are expected by IMD