
Tejaswi Satpute : भरती प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी आमची तयारी पूर्ण; तेजस्वी सातपुते
मुंबई पोलिसांची भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी 31 जानेवारी पासून 8070 जागांसाठी सुरू झाली. मुंबईतील 8 हजार जागांसाठी 7 लाख इच्छुकांनी अर्ज केले आहेत. मुंबई पोलिसांच्या भरती प्रक्रियेतील गेल्या 10 दिवसांत शारीरिक चाचण्यांमध्ये सहभागी दोन इच्छुकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मुंबई पोलीस उपायुक्त (मुख्यालय 2) तेजस्वी सातपुते, यांची भरती प्रक्रियेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळचे प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी भरती प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी कोणती पावले उचलली गेली आहेत या बद्दल पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्याशी केलेली खास बातचीत.
प्रश्न: पोलिस कॉन्स्टेबल आणि पोलिस ड्रायव्हर कॉन्स्टेबलच्या जागांसाठी किती अर्ज आले आहेत आणि शारीरिक चाचण्या पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागू शकतो ?
उत्तर: मुंबई पोलिसांच्या भरती प्रक्रियेत 8070 जागांसाठी 7 लाख इच्छुकांनी अर्ज केले आहेत. 31 जानेवारी रोजी आम्ही प्रक्रिया सुरू केली तेव्हा आम्ही केवळ मरोळ आणि नायगाव येथे शारीरिक चाचण्या घेत होतो. दोन्ही मैदानांवर दररोज सुमारे 2000 उमेदवार चाचणी देऊ शकत होते.15 फेब्रुवारीपर्यंत आम्ही मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील मोकळ्या जागेवर अधिक उमेदवारांसाठी शारीरिक चाचण्या सुरू केल्या .हळुहळू, आम्ही उमेदवारांची संख्या वाढवली आणि आम्ही मरोळ आणि कलिना येथे दोन शिफ्टमध्ये काम करू लागलो. सध्या, आम्ही मरोळ आणि कलिना येथील मैदानावर सुमारे 9000 पुरुष इच्छुकांच्या शारीरिक चाचण्या घेत आहोत. दररोज सुमारे 1,500 उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या घेतल्या जात आहेत… एप्रिल अखेरपर्यंत शारीरिक चाचण्या पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे.
प्रश्न: मैदानी चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांना भरती केंद्रांवर अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागत आहे. त्यावर मात कशी करणार
उत्तर: मुंबई शहराबाहेरून आलेले उमेदवार त्यांच्या मैदानी चाचण्यांच्या एक दिवस अगोदर मैदानाजवळ वास्तव्य करतात आणि हे लक्षात घेऊन आम्ही त्यांच्यासाठी तंबू आणि स्वच्छतागृहे उभारली आहेत. तसेच प्रक्रियेला गती देण्यासाठी आम्ही दोन शिफ्टमध्ये शारीरिक चाचण्या घेण्यास सुरुवात केली, त्यामुळे इच्छुकांची संख्याही वाढली आहे. आम्ही असे गृहीत धरले की ज्यांना सकाळी 5 वाजता ग्राउंडवर रिपोर्ट करण्यास सांगितले तेच वास्तव्य करतील. परंतु ज्या उमेदवारांची रिपोर्टिंगची वेळ सकाळी 10 वाजता आहे ते उमेदवार देखील एक दिवस आधी मैदानावर पोहोचू लागले. सुरुवातीला एक-दोन दिवस अडथळे येत होते पण आम्ही सुधारणा करून त्यानुसार पायाभूत सुविधा वाढवल्या. मात्र सर्व तरतूद करूनही इच्छुक रस्त्यावरच झोपल्याचे पुन्हा पाहायला मिळाले. आम्ही चौकशी केली त्यावर काम केले आणि या समस्यांवर मात करण्यासाठी आत रिपोर्टिंग पॉइंट सेट केला आहे.
प्रश्न:शारीरिक चाचणीत सहभागी होऊन दोन इच्छुकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अधिक जीवितहानी टाळण्यासाठी तुम्ही भरती प्रक्रियेत बदल करण्याचे नियोजन करत आहात का?
उत्तर: या अत्यंत दुर्दैवी घटना आहेत आणि विशेषतः उमेदवारांच्या कुटुंबांचे न भरून निघणारे नुकसान आहे. भरती प्रक्रिया केंद्रावर आरोग्याची प्राथमिक सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु उमेदवारांचे मृत्यू दुर्दैवी आहेत. सध्या हे प्रकरण तपासाधीन आहे आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सची वाट पाहत आहोत... आणि गरज पडल्यास आम्ही त्यानुसार सुधारणा करू...
प्रश्न: अशी जीवितहानी टाळण्यासाठी, उमेदवारांना शारीरिक चाचणीत भाग घेण्यापूर्वी वैद्यकीय चाचणी घेणे शक्य आहे का?
उत्तर: सध्या हे प्रकरण तपासाधीन आहे मृत उमेदवारांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आले नाही आहेत. त्यामुळे या वर आताच काही बोलणं योग्य होणार नाही . उमेदवार धावण्यासाठी पुरेसा फिट आहे की नाही हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शारिरीकदृष्ट्या योग्य आहे का या बाबत काही आगाऊ चाचण्या करणे गरजेचं असल्याचे माझे मत आहे. या पुढे भविष्यात शांसाना तर्फे सुद्धा भरती प्रक्रियेत भाग घेण्यापूर्वी आगाऊ चाचण्या बंधनकारक केल्या तर परिणाम अजून चांगला होईल .
प्रश्न: आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी शारीरिक चाचण्या पूर्ण करण्याचे तुमचे लक्ष्य आहे, या काळात मुंबईत वातावरण उष्ण असते. अशा हवामानामुळे शारीरिक चाचण्या फेब्रुवारीऐवजी ऑक्टोबरमध्ये सुरू करणे योग्य होईल असे तुम्हाला वाटते का?
उत्तर: हे शक्य आहे कारण त्या काळात वातावरणात उष्णता कमी असते. परंतु सध्या सुरू असलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवारांची भर दुपारी धावपळ न घेता अडचण येणार नाही याची काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मैदानी चाचणी आम्ही आता सकाळी सकाळी खूप लवकर सुरुवात करतो जेणेकरून भर दुपारी उमेदवारांना गरमीचा त्रास होऊ नये . दुसरीकडे, उमेदवारांसाठी आम्ही भरती प्रक्रिया केंद्रावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
प्रश्न: डमी उमेदवार किंवा भरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी काय पावले उचलली गेली आहेत?
उत्तर: भरीत केंद्रांवर उमेदवारांचे हॉल तिकीट तपासल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जातो. त्यानंतर आम्ही त्यांची तपशीलवार नोंदणी पूर्ण करतो. ज्या दरम्यान आम्ही त्यांचे बायोमेट्रिक्स, छायाचित्रे आणि त्यांच्या सरकारी ओळखपत्रांसह उमेदवारांनी दिलेल्या तपशीलांची तपासणी करतो. आम्ही गैरप्रकार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत आणि जर आम्हाला उमेदवाराच्या ओळखीबद्दल शंका वाटत असेल तर आम्ही लगेच त्या व्यक्तीला कॉल करतो आणि सुरुवातीला गोळा केलेल्या बायोमेट्रिक्ससह तपशील पडताळतो. उमेदवाराने अवैध मार्ग निवडल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.