जलवाहतुकीचा अडथळा दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thane

Mumbai : जलवाहतुकीचा अडथळा दूर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : पाच वर्षांपासून रखडपट्टी सुरू असलेल्या जलवाहतूक प्रकल्पाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या ‘सागरमाला’ योजनेतून जलवाहतुकीसाठी ९८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आता राज्य सरकारच्या बंदरे, गृह विभागाची मंजुरी आणि सीआरझेडकडून हिरवा कंदील मिळणे शिल्लक आहे. या दोन मंजुऱ्या मिळताच वर्षाअखेरीस पहिल्या टप्प्यातील कोलशेत, भिवंडी काल्हेर, डोंबिवली, भार्इंदर येथील जेटींच्या कामांच्या भूमिपूजनाचा नारळ फुटणार आहे.

ठाणे पालिकेने सहा पालिकांना जोडणाऱ्या जलवाहतुकीचा सविस्तर अहवाल तयार केला होता. केंद्र सरकारने त्याला २०१८ साली मंजुरी दिली. तसेच पहिल्या टप्प्यासाठी १०० टक्के; तर दुसऱ्या टप्प्यासाठी ५० टक्के अनुदान देण्याचे आश्वासन दिले. मात्र राजकीय घडामोडींचा फटका या प्रकल्पाला बसला व जलवाहतुकीचा मार्ग खडतर बनत गेला.

जलवाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या जेटींचे काम सुरू करण्यासाठी मेरिटाईम बोर्डाने १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला प्रस्ताव एप्रिल २०२१ मध्ये केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्प विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला. तीन महिने उलटूनही परवानगी मिळत नसल्याने खासदार राजन विचारे यांनी दिल्लीत केंद्रीय जलसंधारण मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेत निधीचा मार्ग मोकळा करण्याचे साकडे घातले. त्यानुसार सागरमालामधून ९८ कोटींचा निधी मिळाल्यानंतर आता जेट्टीचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी विचारे यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांची भेट घेतली.

राज्य सरकारच्या प्रशासकीय मंजुरीसाठी बंदरे गृह विभागाकडे जेटींचा अहवाल सादर करण्यात आला असून, सीआरझेडचे ना हरकत मिळताच वर्षाअखेरीस जेट्टीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी दिली असल्याचे खासदार विचारे यांनी सांगितले.

प्रकल्प मोलाचा...

ठाणे ही आशिया खंडातील सर्वांत मोठी खाडी असून जिल्ह्याला ६,५२२.५ हेक्टर इतकी विस्तीर्ण खाडी लाभली आहे.जिल्ह्याला लाभलेला खाडीकिनारा लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने २०१६ साली जलवाहतुकीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. वाहतूक कोंडीतून सुटका आणि प्रवासासाठी उत्तम पर्याय म्हणून हा प्रकल्प मोलाचा ठरणार असल्याने जिल्ह्यातील सहा महापालिकांना जोडणाऱ्या जलवाहतुकीचा सविस्तर अहवाल पालिकेने तयार केला.

बेलापूरमधून लवकरच सागरी प्रवास

नवी मुंबईत बेलापूर येथे उभारण्यात आलेल्या जेट्टीचेही १०० टक्के काम पूर्ण झालेले आहे. सदर जेटीसाठी केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून ७ कोटी ५० लाख व राज्य सरकारकडून प्रवाशांच्या सोयी-सुविधेसाठी ४ कोटी असे एकूण ११ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे बेलापूरमधून जलवाहतूक सुरू करण्यासाठी प्रवासी बोटीची लवकर व्यवस्था करावी, अशा सूचना खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांना केली आहे.

loading image
go to top