ठाण्यातील मामलेदार मिसळचे सर्वेसर्वा लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे निधन

ठाण्यातील मामलेदार मिसळचे सर्वेसर्वा लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे निधन

मुंबईः  ठाण्यातील प्रसिद्ध मामलेदार मिसळचे सर्वेसर्वा लक्ष्मण मुर्डेश्वर उर्फ मामा (वय 84) यांचे मंगळवारी दुपारी कोरोनाने निधन झाले. गेले पंधरा दिवस ते खासगी रुग्णालयात कोरोनाशी लढा देत होते. अखेर मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मुळचे कर्नाटकचे असलेले मामांचे कुटूंब ठाण्यात आले आणि मिसळीचा व्यवसाय त्यांनी येथे सुरु केला. आज या मिसळीची ख्याती जगप्रसिद्ध असून मामांच्या निधनाने ठाणेकर एकच हळहळ व्यक्त करीत आहेत.

देशाच्या कोणत्याही भागातून व्यक्ती ठाण्यात आली की मामलेदार मिसळ खाल्ल्याशिवाय परत जात नाही असे म्हणतात. मामलेदार मिसळ हा एक ब्रॅंड झाला. डोंबिवलीतही नुकतीच मामलेदार मिसळची शाखा उघडण्यात आली आहे. अनलॉकच्या टप्प्यातही खवय्यांनी या शाखेला भेट देत मामलेदार मिसळची चव चाखली आहे. मामलेदार मिसळची मुहूर्तमेढ 1946 साली रोवली गेली.

लक्ष्मण यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर यांनी मामलेदार कचेरीबाहेर एक उपहारगृह सुरु केले. नरसिंह यांच्या पत्नीने मिसळीचा मसाला सर्वात आधी तयार केला होता आणि आजही अगदी तसाच मसाला मिसळीसाठी वापरला जातो, त्यात किंचितही बदल झाला नसून हीच या मिसळीची खासियत असून तिची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही.

केवळ देशात नाही तर परदेशातही मामलेदार मिसळची महती पसरली असून येथून पार्सलने अनेक खवय्ये मिसळ परदेशात घेऊन जातात. मागील वर्षी कल्याण येथील सभा आटोपल्यानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही ठाणे येथे थांबत मामलेदार मिसळीची चव मुलगा अमित याच्यासोबत चाखली होती. मिसळीच्या व्यवसायातून लाखोंची उलाढाल होऊनही लक्ष्मण मामा यांची राहणीमात्र साधी राहिली आहे. व्यवसायासह सामाजिक कार्यातही मामा नेहमीच पुढाकार घेतात. जव्हार, मोखाडा येथे त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा बांधून दिली आहे. मात्र प्रसिद्धीचा त्यांना कधीही हव्यास वाटला नाही, किंवा त्यांच्या व्यवसायाची त्यांनी कधीही जाहिरातही केली नाही. त्यांच्या या कार्याची दखल घेत ठाणे महापालिकेने 1 ऑक्टोबर 2015 रोजी त्यांना ‘ठाणेभूषण पुरस्कार’ देऊन गौरविले होते.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

owner of Mamledar Misal Laxman Murdeshwar Thane passes away

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com