Sri Family Guide initiative: ही सूर-संध्या गुरुवंदनेसाठीच! शंकर महादेवन यांनी सांगितला आध्यात्मिक गायनाचा अनुभव

‘‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवासारख्या मोठ्या आध्यात्मिक व्यासपीठावर मला गाण्याची संधी मिळते, हा मी गुरूंचा आशीर्वाद समजतो. महाराष्ट्राला संतांची महान परंपरा आहे, तशीच भक्तांची मांदियाळीही मोठी आहे.
paduka darshan sohala 2024 singer shankar mahadevan talks about Bhakti Tradition Devotional Songs family guide initiative
paduka darshan sohala 2024 singer shankar mahadevan talks about Bhakti Tradition Devotional Songs family guide initiativeSakal

‘‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवासारख्या मोठ्या आध्यात्मिक व्यासपीठावर मला गाण्याची संधी मिळते, हा मी गुरूंचा आशीर्वाद समजतो. महाराष्ट्राला संतांची महान परंपरा आहे, तशीच भक्तांची मांदियाळीही मोठी आहे.

या भक्तांच्या हृदयात वसणाऱ्या त्या गुरूंना वंदन करणारी ही सूर-संध्या असणार आहे. येथे मी संतांच्या आणि भक्तांच्या मेळ्यामध्ये आपली गायनसेवा सादर करणार आहे,’’ असे मत प्रख्यात गायक शंकर महादेवन यांनी ‘सकाळ’च्या पादुका उत्सवातील आपल्या कार्यक्रमासंदर्भात व्यक्त केले.

संकल्प ते सिद्धी सोहळ्याच्या माध्यमातून ‘सकाळ’ने सामाजिक, आध्यात्मिक, शारीरिक आणि आर्थिक प्रगती साधण्याचा मार्ग दाखवला आहे. याबाबत काय वाटते?

‘सकाळ’ने यापूर्वीही अनेक अत्यंत चांगले उपक्रम राबविले आहेत. ज्यातून समाजाचा मोठा फायदा झालेला आहे. या वेळेस आयोजित केलेला ‘संकल्प ते सिद्धी सोहळा’ हा सर्वार्थाने एक वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे.

या उपक्रमाला आध्यात्मिक आधार आहे. त्याची आज संपूर्ण भारत देशाला गरज आहे. आपली संस्कृती, परंपरा आणि आपले अध्यात्म म्हणजे जीवन जगण्याची कला आहे. आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत, पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव आपल्यावर, विशेषतः तरुण पिढीवर पडताना दिसतो. तो केवळ वेशभूषेत नव्हे, तर संगीत, विचार, जीवनशैलीतही दिसतो.

यामुळे मानसिक स्वास्थ्य हरवलेले आहे. इंटरनेटच्या या जमान्यात कुटुंबातील संवादही थांबलेला आहे. अशा वेळेस गुरूसेवक होण्याचा संकल्प मांडणारी ही संकल्पना मला मनापासून भावली. आपल्या गुरू परंपरेतून आजच्या तरुणाईला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. हा सोहळा सर्व दृष्टिकोनातून ऐश्वर्याचा पाया आहे.

धार्मिक, आध्यात्मिक गायनाचा अनुभव कसा आहे?

मी स्वतः धार्मिक आणि आध्यात्मिक गायन अनेकदा केलेले आहे. यातील भजने, गाणी, स्तोत्रे संपूर्ण भारतात लोकप्रिय आहेत. या शब्दांमधले गूढार्थ उलगडत जातात, तेव्हा माझ्यातल्या गायकालाही एक प्रकारचा आत्मिक आनंद मिळत असतो. या रचनांमधला भाव समजून गायचे असते, तेव्हा तर माझ्यामध्ये एक वेगळी ऊर्जा मला जाणवते.

जीवनात गुरूंचे महत्त्व काय असते?

गुरू नसल्यास माणूस काहीच करू शकणार नाही. जन्माला आल्यापासून आपल्याला अनेक गुरू मार्ग दाखवत असतात. आई-वडील पहिले गुरू असतात. शिक्षक हेही आपले मोठे गुरू, जे आपल्याला ज्ञानसंपन्न बनवून जीवन जगण्यासाठी पात्र बनवतात.

प्रभू दत्तात्रेयांच्या २४ गुरूंमध्ये पशू-पक्ष्यांचाही समावेश आहे. आपल्याला येत नसलेली गोष्ट शिकवतो तो आपला गुरू, असे मी मानतो. भौतिक जीवनात आपण काही तरी शिकतच असतो. भौतिक सुखांसोबत मनःशांती आणि शाश्वत सुखासाठी आध्यात्मिक गुरूंची नितांत आवश्यकता आहे.

आध्यात्मिकता आणि संगीत यांचा मिलाफ कसा होतो?

संगीताची निर्मितीच अध्यात्मातून होते. संगीताची देवता माता सरस्वती आहे, जी विद्येचीही देवता आहे. सप्तसुरांतून निर्माण होणारे संगीत तुम्हाला ईश्‍वराच्या अधिक जवळ नेणारे आहे. तुम्ही मोठमोठ्या शास्त्रीय गायकांना नुसते ऐकता, तरी तुमची ब्रह्मानंदी टाळी लागते.

कारण, या सुरांमध्ये आणि गायनामध्ये माझ्यातला छोटासा ‘मी’ हा इतक्या उंचावर जातो आणि अमर्याद होऊन विश्‍वरूप होतो. श्रोत्यांची अशी अवस्था असते, तर गायकांची अवस्था किती आध्यात्मिक असू शकेल? हा मिलाफ साधायचा असल्यास संगीताला साधना आणि स्वतःला साधक किंवा उपासक समजले पाहिजे. ही साधना, ज्याला आम्ही रियाज म्हणतो, तो जितका अधिक तितकी तुम्हाला आध्यात्मिक अनुभूती येऊ शकते.

भारतीय गीत-संगीताविषयी आपणास काय वाटते?

गीत-संगीतातून तुमची संस्कृती तुम्ही संपूर्ण जगासमोर प्रदर्शित करू शकता. त्यातूनच आपल्या संतांच्या रचना, शास्त्रीय राग आणि हल्ली पारंपरिक वाद्यांसोबतच आधुनिक वाद्यांचाही असलेला समावेश हे सगळेच अत्यंत प्रभावशाली आहे. या गीत-संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे श्रोता कोणत्याही देशातला असो, कोणतीही भाषा बोलणारा असो, आपल्या संस्कृतीतले गीत-संगीत प्रत्येकाच्या आत्म्याला स्पर्शणारे आहे.

‘सूर-संध्या’ संगीतमय कार्यक्रमाबद्दल काय सांगाल?

श्री फॅमिली गाईड सारख्या मोठ्या आध्यात्मिक व्यासपीठावर मला गाण्याची संधी मिळते, हा मी गुरूंचा आशीर्वाद समजतो. महाराष्ट्राला संतांची महान परंपरा आहे, तशीच भक्तांची मांदियाळीही मोठी आहे. या भक्तांच्या हृदयात वसणाऱ्या त्या गुरूंना वंदन करणारी ही सूर-संध्या असणार आहे. येथे मी संतांच्या आणि भक्तांच्या मेळ्यामध्ये आपली गायनसेवा सादर करणार आहे. ती रुजू व्हावी आणि सर्वांचे आशीर्वाद व कृपा मला लाभावी, एवढीच माझी मनापासून इच्छा आहे.

भक्तिगीते व भजनाच्या संस्कारांचे महत्त्व काय आहे?

आयुष्यातून संगीत वजा केल्यास आयुष्य बेसूर होईल. भक्तिगीतांनी आणि भजन-किर्तनांनी आपल्या मनावर नकळत संस्कार घडवले आहेत. ते भक्ती-संगीत अगदी चित्रपटातील का असेना, ते आपल्या हृदयात चांगले संस्कार घडवत आहे. हा सांगीतिक वारसा एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे अखंडपणे जात आहे. यातूनच नव्या संस्कारशील पिढ्या घडलेल्या आहेत आणि यापुढेही घडत राहतील.

पादुका दर्शन सोहळ्याबाबत तुमच्या भावना काय आहेत?

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात मुळात गुरूंचे स्थान अनन्यसाधारण आहे. गुरू देहात नसतात, तेव्हा त्यांची शक्ती पादुकांमध्ये असते. त्यामुळेच या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मी नेहमी आतुर असतो. ‘मी ठेवितो मस्तक ज्याठिकाणी, तेथे तुझे सद्‌गुरू पाय दोन्ही’ या भावनेतून मी पादुकांचे दर्शन घेतो, तेव्हा मला अंतरंगात दिव्य ऊर्जा जाणवते.

महाराष्ट्रात अनेक संत-गुरू होऊन गेले आहेत व त्याबद्दल आपण स्वतःला खूप भाग्यशाली समजले पाहिजे. संतांच्या-गुरूंच्या स्थानांना भेटी देणे आणि त्यांच्या पादुकांचे दर्शन घेणे, ही भाविकांसाठी खूप मोठी पर्वणी असते.

महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने मी ‘सकाळ माध्यम समूहा’चे आभार मानतो की, त्यांनी श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅमच्या माध्यमातून एकाच ठिकाणी १८ संतमहात्म्यांच्या पादुकांच्या दर्शनाची सुवर्णसंधी आम्हाला उपलब्ध करून दिली आहे. येथे एकाच ठिकाणी संतांचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्याची अलौकिक पर्वणी संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com