Paduka Darshan Utsav : ‘भक्ती-शक्ती’तून सश्रद्ध समाजाची निर्मिती; मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्‍गार

‘श्रीगुरू पादुका सोहळ्यानिमित्त २१ संत व श्रीगुरू पादुकांच्या दर्शनातून सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते.
cm devendra fadnavis, pralhad wamanrao pai and abhijit pawar
cm devendra fadnavis, pralhad wamanrao pai and abhijit pawarsakal
Updated on

मुंबई - ‘श्रीगुरू पादुका सोहळ्यानिमित्त २१ संत व श्रीगुरू पादुकांच्या दर्शनातून सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते. या संतांनी समाजाला दिशा, विचार, तसेच जीवनमूल्ये दिली. ती आत्मसात करून मूल्याधिष्ठित जीवन कसे जगता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवा. आयुष्यात भक्ती आणि शक्ती किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित करण्याचे काम भक्ती-शक्ती व्यासपीठ करीत आहे.

या व्यासपीठाच्या माध्यमातून सश्रद्ध आणि समतायुक्त समाजाची निर्मिती होईल. त्यामुळे संकुचित विचार सोडून समाजाची आध्यात्मिक बैठक निर्माण होईल आणि त्यातून आपल्या देशाच्या कल्याणाकरिता काम करता येईल,’ असे गौरवोद्‍गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.

‘सकाळ माध्यम समूहा’द्वारे आयोजित श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यात ‘भक्ती-शक्ती व्यासपीठा’चे शनिवारी (ता. ८) वरळीच्या ‘एनएससीआय डोम’ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. या वेळी ‘जीवनविद्या मिशन’चे प्रल्हाद वामनराव पै, ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक व ‘एपी ग्लोबाले’चे अध्यक्ष अभिजित पवार उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की आज या ठिकाणी सूक्ष्मरूपात आलेल्या गुरुजनांनी समाजाला दिशा, विचार, जीवनमूल्ये दिली. त्यांच्या पादुकांच्या दर्शनातून सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये जे कार्य करतोय, त्यातून मूल्याधिष्ठित जीवन कसे जगता येईल, आपल्या जीवनाला भक्तीची, अध्यात्माची दिशा कशी देता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवे.

‘सकाळ माध्यम समूहा’ने सुरू केलेल्या भक्ती-शक्ती व्यासपीठाचा उपयोग करून समाजातील विविध लोकांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा संकलित करण्याचे आणि त्यासोबत पैशाच्या व्यतिरिक्त समाज श्रम, प्रेम, सेवा तसेच आणखी काय देऊ इच्छितो, हे लक्षात येईल. अभिजित पवार यांनी हा अतिशय चांगला उपक्रम सुरू केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.

भक्ती-शक्ती व्यासपीठाला राज्य सरकारच्या माध्यमातून योग्य ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी या वेळी दिली. दरम्यान, उद्‍घाटन सत्रानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व संत व श्रीगुरूंच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच पंजाबमधून आलेल्या संत नामदेवांच्या पादुकांच्या सेवेकऱ्यांची विचारपूस करून त्यांचे आभार मानले.

पादुकांचे यथोचित महत्त्व

भारतीय समाजात पादुकांचे महत्त्व सांगण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रभू श्रीराम आणि भरत यांचे उदाहरण दिले. प्रभू श्रीराम वनवासात असताना भरत यांनी त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य चालविले. त्या पादुका सिंहासनावर स्थानापन्न केल्यानंतर त्या केवळ पादुका नव्हत्या तर त्या पादुकांच्या स्वरूपामध्ये प्रत्यक्ष श्रीराम त्या ठिकाणी होते. अशा पद्धतीने १४ वर्षे कारभार चालविण्यात आला म्हणून आपल्या समाजामध्ये पादुकांना मोठे महत्त्व असल्याचेही फडणवीस म्हणाले.

..तर भारत विश्वगुरू; ‘जीवनविद्या’चे प्रल्हाद पै यांचा विश्वास

‘प्रत्येकाने भक्ती, शक्ती, प्रपंच आणि परमार्थाचा समन्वय साधल्यास भारत देश केवळ महासत्ता होणार नाही, तर विश्वगुरू होईल,’’ असा विश्वास ‘जीवनविद्या मिशन’चे प्रल्हाद वामनराव पै यांनी व्यक्त केला. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित श्रीगुरू पादुका दर्शन सोहळा व भक्ती-शक्ती व्यासपीठाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.

सद्‍गुरू श्री वामनराव पै यांच्या ‘हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे’ या प्रार्थनेने पै यांनी प्रारंभ केला.

ते म्हणाले, ‘आजचे भक्ती आणि शक्ती व्यासपीठ महिलादिनानिमित्त ‘सकाळ’ने उपलब्ध करून दिले आहे. भक्ती आणि शक्तीचे रूप म्हणजे महिला आहेत. कारण भक्ती आणि शक्ती या मानवी जीवनात खूप महत्त्वाच्या आहेत. सद्‍गुरू श्री वामनराव पै यांनी जीवनविद्येचे तत्त्वज्ञान याच माध्यमातून सांगितले आहे; परंतु काही लोक केवळ अध्यात्म करतात, तर काही लोक केवळ प्रपंच करतात; पण जीवनात भक्ती आणि शक्ती अर्थात अध्यात्म आणि प्रपंच यांचा समन्वय साधणे खूप महत्त्वाचे आहे.

आकाशात विहार करण्यासाठी पक्ष्याला दोन्ही पंखांची गरज असते. तसे माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी, भरारी घेण्यासाठी, सुख व समृद्धीने विहार करण्यासाठी भक्ती आणि शक्ती या दोन पंखांची गरज असते. प्रपंच आणि परमार्थ, ईश्वर आणि ऐश्वर्याची आवश्यक असते. त्यामुळे भक्तीचे संस्कार होणे गरजेचे आहे.’

भक्तीची उपासना महत्त्वाची

पुढे पै म्हणाले की, आपण पादुका दर्शन सोहळ्यात संत व सद्‍गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांचे मार्गदर्शनही आत्मसात केले पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या भक्तीची उपासना केली पाहिजे. कारण संतांनी सांगितलेल्या विचारातूनच आपल्याला समाजात परिवर्तन करायचे आहे.

मी स्वतःमध्ये परिवर्तन करेन, भक्ती व शक्तीचा समन्वय साधेल, प्रपंच व परमार्थाचा समन्वय साधेल, असे प्रत्येकाने ठरविल्यास भारत देश केवळ महासत्ता होणार नाही तर विश्वगुरू होईल. केवळ दर्शन घेतले, पूजा-अर्चा केली, भजन-कीर्तन केले म्हणजे भक्ती नाही. तर आपल्याला सर्व संतांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’, ‘सर्वेसुखीनासंतु’ असे तत्त्वज्ञान सांगितले आहे. ही वृत्ती आपल्यामध्ये अंगीकारली पाहिजे.

माणसांसारखे वागले पाहिजे

‘माणसांनी माणसांबरोबर माणसांसारखे वागले पाहिजे. म्हणजेच माणुसकीने वागले पाहिजे. माणुसकी ही भक्ती आहे. भक्ती ही दर्शनाने सुरू होते आणि मार्गदर्शनाने संपते. या मार्गदर्शनाने आपल्यामध्ये परिवर्तन घडवायचे असते. परिवर्तन ही वृत्ती म्हणजे शक्ती आहे. हाच मार्ग सर्व संत व सद्‍गुरूंनी सांगितला आहे. या मार्गाने आपण वागलो तर सुखाची प्राप्ती होईल.

ईश्वर व ऐश्वर्य एकत्र नांदले पाहिजे. त्यातून सर्वांचे सुख साधले पाहिजे. सर्वांना सुखी करणे आपल्या हातात नसले तरी तशी इच्छा व्यक्त करणे, सर्व सुखी व्हावे असे चिंतन करणे आवश्यक आहे. त्यासाठी भक्ती व शक्तीचे हे व्यासपीठ महत्त्वाचे आहे,’ असे पै यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com