esakal | पालघर: अनधिकृत वाळू उत्खननावर कारवाई, वाळू माफियांना दणका
sakal

बोलून बातमी शोधा

manor

पालघर: अनधिकृत वाळू उत्खननावर कारवाई, वाळू माफियांना दणका

sakal_logo
By
दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

मनोर : वैतरणा खाडीचे पात्र पोखरणाऱ्या वाळू माफियांवर कारवाईसाठी महसूल विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनधिकृत वाळू उत्खनन रोखण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता.06) मोहीम राबविण्यात आली. कारवाई दरम्यान वैतरणा खाडी पात्रात वाळू उत्खनन करणाऱ्या चार लोखंडी बोटी आणि दोन मशीन नष्ट करण्यात आल्या आहेत. महसूल विभागाच्या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचा: जनतेचे आरोग्य महत्वाचे, उत्सव नंतरही साजरे करू शकता : मुख्यमंत्री

पालघरचे उपविभागीय अधिकारी धनाजी तोरसकर पालघर यांच्या नेतृत्वातील कारवाई पथकात जिल्हा खनिकर्म अधिकारी अनिल कांबळे, पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे, केळवा पोलीस ठाण्याचे प्रभारी भीमसेन गायकवाड, सफाळे पोलिस ठाण्याचे प्रभारी संदीप कहाळे, सफाळे मंडळ अधिकारी राजू पाटील, संदिप म्हात्रे, अनिल वायाळ, तलाठी संजय चुरी, रशिद, नितीन सुर्वे, महेश कचरे, दळवी आणि जोगदंड यांनी भाग घेतला होता.

पारगाव, सोनावे आणि दहिवाळे गावच्या हद्दीतील वैतरणा खाडी पात्रात अनधिकृत वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. उपलब्ध माहिती नुसार सोमवारी कारवाई करण्यात आली आहे. सकाळी आठ वाजताच्या सुमारास पारगाव पुलाखालून दोन स्वयंचलित बोटींमध्ये कारवाई पथकात सहभागी अधिकारी आणि कर्मचारी बसून वैतरणा खाडी पात्रात कारवाईसाठी निघाले होते.

हेही वाचा: फादर दिब्रिटो ह्यांना पद्मश्री विखेपाटील पुरस्कार प्रदान

यावेळी त्यांना खाडी पात्रात वाळू उत्खनन करताना चार लोखंडी बोटी आणि दोन सक्शन मशीन आढळून आल्या. कारवाई पथक पोहोचण्याआधी सक्शन पंप आणि लोखंडी बोटींवरील कामगार पळून गेले होते. ताब्यात घेतल्यानंतर चार बोटी जाळून नष्ट करण्यात आल्या, तर दोन्ही सक्शन पंप वैतरणा नदीच्या खोल पाण्यात बुडवण्यात आले.

दरम्यान अनधिकृत वाळू उत्खनन प्रकरणी वाळू माफियांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सुनील शिंदे यांनी दिली. यापुढे वैतरणा नदी पात्रात अनधिकृत वाळू उत्खनन करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

महसूल विभागाने वरिष्ठ अधिकारी अनधिकृत वाळू उत्खननावर कारवाईसाठी आग्रही असले तरी तलाठी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या हफ्तेबाजीमुळे कारवाई नंतरच्या काही दिवसांनी पुन्हा वाळू उत्खनन सुरू सुरू होत असल्याने पर्यावरण प्रेमी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

loading image
go to top