धक्कादायक! ऐन पावसाळ्यात पालघर जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर 

पालघर दुष्काळ.
पालघर दुष्काळ.
Updated on

मोखाडा  : कोकणाचा एक भाग असलेल्या पालघर जिल्ह्यात यंदा वरुणराजाची फारशी कृपा झाली नाही. जिल्ह्यातील आदिवासी डोंगराळ तालुक्‍यांमध्ये एकमेव खरिपाचेच पीक घेतले जाते. खरीप हंगामातील लावणीची कामे मागील 10-12 दिवसांपासून पावसाअभावी खोळंबली आहेत; तर ज्या पिकांची लावणी झालेली आहे तेथे कडक ऊन्हामुळे शेतजमिनीला भेगा पडल्या आहेत. गतसालच्या तुलनेने जिल्ह्यात सरासरी 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगामच धोक्‍यात आला असून पालघर जिल्ह्यावर पावसाअभावी दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. परिणामी आता पालघर जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. 

पालघर जिल्ह्यात खरिपाचे 1 लाख 5 हजार हेक्‍टर शेतीचे क्षेत्र आहे. यामध्ये 75 हजार हेक्‍टर भात, 15 हजार नागली आणि 10 हजार वरई या मुख्य आणि नगदी पिकांचे; तर उर्वरित क्षेत्र इतर पिकांचे आहे. या वर्षी वेधशाळेने 102 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी तालुक्‍यांमध्ये संपूर्ण शेती ही पावसावरच अवलंबून आहे. जुलैअखेर खरिपाच्या हळव्या आणि गरव्या पिकांची लावणी पूर्ण होते; मात्र यावर्षी जुलै महिना सरत आला, तरी जिल्ह्यात पावसाअभावी भात आणि नागलीची लावणी पूर्ण झालेली नाही; तर जी लावणी झालेल्या शेतात तुरळक पाऊस आणि कडक ऊन पडत असल्याने भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. जिल्ह्यात 27 जुलैपर्यंत सरासरी 588. 6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे; तर गतसाली आतापर्यंत 1 हजार 577.1 इतका पाऊस झाला होता. प्रतिवर्षी जिल्ह्यात सरासरी 3 हजार मि.मी पर्यंत पावसाची नोंद होते. त्यामुळे गतसालच्या तुलनेने यंदा 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिना तुफान पर्जन्यवृष्टीचा असताना जिल्ह्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे या वर्षाचा संपूर्ण खरीप हंगाम धोक्‍यात आला असून, पावसाची अशीच स्थिती यापुढे राहिल्यास जिल्ह्यात भविष्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार असल्याने पालघर जिल्हा सद्यस्थितीत दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. 2018 मध्ये जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती याही वर्षी होते की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

 

जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून हलक्‍या पावसाच्या सरी बरसत आहे. त्यामुळे लावणी केलेल्या पिकाला त्याने जीवदान मिळेल. जुलैअखेरपर्यंत उर्वरित लावणी पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्याचा पिकाच्या उत्पादनावर परिणाम होईल, असे वाटत नाही. 
- काशिनाथ तरकसे, जिल्हा कृषी अधिकारी 

 
सद्यस्थितीत अनेक भागांत पावसाअभावी भात आणि नागलीची लावणी खोळंबली आहे; तर मागील आठवड्यात लावणी केलेल्या शेतात उन्हामुळे भेगा पडू लागल्या आहेत. याचा मोठा परिणाम उत्पादनावर होणार आहे. कोरोना स्थितीमुळे कृषी अधिकारी आणि कर्मचारी अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर आलेले नाहीत, त्यामुळे त्यांना वास्तवतेची जाणीव नाही. पावसाची हीच स्थिती राहिल्यास जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण होईल आणि शेतकऱ्यांवर उपासमार ओढवेल.   

-  प्रदीप वाघ, शेतकरी आणि पंचायत समिती सदस्य 


तालुकानिहाय 27 जुलैपर्यंत पावसाची नोंद 

1) वसई - 755.1 

2) वाडा - 555.0 

3) डहाणू - 480.3 

4) पालघर - 704.5 

5) जव्हार - 523.5 

6) मोखाडा - 332.5 

7) तलासरी - 394. 2 

8) विक्रमगड - 597. 9 

सरासरी - 588.6 
----------------------- 

सन 2019 मधील 27 जुलैपर्यंत पावसाची नोंद 

1) वसई - 1,586.6 

2) वाडा - 1,866.2 

3) डहाणू - 1,403.6 

4) पालघर - 1,734.8 

5) जव्हार - 1,377.5 

6) मोखाडा - 1,317.3 

7) तलासरी -1,423.2 

8) विक्रमगड - 1,539.0 

सरासरी - 1,577.1 

Palghar district on the brink of drought

( संपादन ः रोशन मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com