हा दोष कुणाचा? व्हेंटिलेटरसाठी सहा तास, तर अंत्यसंस्कारासाठी 16 तासांची प्रतिक्षा....

हा दोष कुणाचा? व्हेंटिलेटरसाठी सहा तास, तर अंत्यसंस्कारासाठी 16 तासांची प्रतिक्षा....

पनवेल : मुंबईनजीकच्या महानगरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव थांबता थांबत नाही आहे. अनेक रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातही रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यास ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटर वेळेवर उपलब्ध न झाल्यास येणाऱ्या रुग्णांसह नातेवाईकांची मोठी धावपळ होत असल्याचे अनेक उदाहरण समोर आले आहे. एवढेच नव्हे तर काही रुग्णांना व्हेंटिलेटर वेळेवर उपलब्ध न झाल्याने जीव गमावण्याची वेळ आली आहे. अशाच प्रकारे कळंबोली येथील विमल चव्हाण यांना काल दुर्देवी मृत्यू झाला. मात्र व्यवस्थेशी होत असलेला संघर्ष इथेच थांबला नाही. मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना 16 तासांहून अधिक वेळ प्रतिक्षा करावी लागत आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात व्हेंटिलेटर अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहे. पनवेल पालिका हद्दीत निर्माण करण्यात आलेल्या कोव्हिड स्पेशल रुग्णालयातही सध्या व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. कळंबोली वसाहतीत राहणाऱ्या विमल चव्हाण या महिलेला वेळेवर व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने आपले प्राण गमवावे लागल्याची घटना रविवारी (ता. 26) रात्री घडली.  चव्हाण यांना रविवारी सायंकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने चव्हाण यांच्या नातेवाईकांनी सायंकाळी त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेले. 

त्यावेळी तेथील डॉक्टरांनी चव्हाण यांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याचे सांगत आपल्या रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले, त्यामुळे ऑक्सिजन बेड असलेल्या रुग्णालयाच्या शोधात चव्हाण यांच्या नातेवाईकांनी पनवेल पालिका हद्दीतील तसेच नवी मुबंई पालिका हद्दीतील रुग्णालय पालथे घातले. नातेवाईकांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होण्यास 6 तासापेक्षा अधिक काळ वाया गेला. अखेर रात्री दीडच्या सुमारास पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध झाला. मात्र त्यावेळी त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याने आणि तो वेळेवर उपलब्ध न झाल्याने चव्हाण यांना आपले प्राण गमवावे लागले. 

कोरोनाला रोखण्यासाठी नवी मुंबई आयुक्तांकडून 'हा' पॅटर्न लागू

पालिका हद्दीत केवळ 35 व्हेंटिलेटर
पनवेल पालिका हद्दीत खाजगी तसेच सरकारी रुग्णालयात एकूण 35 व्हेंटिलेटर उपलब्ध असून सर्वच व्हेंटिलेटर वापरात असल्याची माहिती पालिका उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.  

अंत्यसंस्कारासाठीही प्रतिक्षा
पनवेल पालिका हद्दीत सध्या पोदी येथील स्मशानभूमी आणि अमरधाम स्मशानभूमी या ठिकाणी असलेल्या 2 गॅस शवदाहिन्यांवर कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. सद्यस्थितीत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढल्याने शवदाहिन्यांवर ताण वाढल्याने त्या वारंवार बंद पडत असल्याने कोरोना मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्यासाठी तासनंतास ताटकळत राहावे लागत आहे.

ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरमधील फरक समजत नसल्याने गोंधळ 
अनेकदा रुग्णाच्या नातेवाईकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरमधील फरक कळत नाही. ऑक्सिजन बेडच्या शोधात रुग्णांचे नातेवाईक रुग्णांचा महत्वाचा काळ वाया घालवत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांचे म्हणणे आहे. अत्यवस्थ असलेल्या रुग्णाला तात्काळ ऑक्सीजन बेड उपलब्ध होऊ न शकल्यास अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात येते आणि त्यानंतरही रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यास शेवटच्या टप्यात व्हेंटिलेटरवर ठेवले जाते. याबाबत नातेवाईकांना माहिती नसल्याने अनेकदा रुग्णाचा महत्वाचा वेळ वाया जात आहे. 
----

संपादन ः ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com