पाली : सुधागडमधील ११ गावांत दारू, डिजेवर बंदी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू, डिजेवर बंदी!

पाली : सुधागडमधील ११ गावांत दारू, डिजेवर बंदी!

पाली : लग्न म्हटले की मद्याचा महापूर, लाऊड स्पीकरवरील गीते, अशी कुप्रथा काही वर्षांपासून सुरू आहे. या विरोधात उरण, पनवेल, कर्जत तालुक्यांतील अनेक गावांनी पाऊल उचलले आहे. आता ही मंगलयात्रा सुधागड तालुक्यापर्यंत पोचली असून २१ गणपती येथील सिद्धेश्वर आणि भार्जे पंचक्रोशीतील ११ गावांनी लग्नात मद्य आणि डिजेला बंदी केली आहे. विवाह सोहळ्यात मोठा खर्च होतो. ऐपत नसतानाही काही जण खोट्या प्रतिष्ठेमुळे हा खर्च करतात. त्यामुळे हा एक महत्त्वाचा विधायक निर्णय घेण्यात आला.

मराठा समाजाची एकवीस गणपती मंदिर सभागृहात गुरुवारी (ता.२३) सभा घेण्यात आली. या सभेमध्ये वाढती महागाई, कोरोनामुळे रोजगारावर आलेली गदा आदी विषय चर्चेला आले. सध्या धनिक लग्नात मद्य व डिजेवर लाखो रुपयांची उधळपट्टी करतात. मात्र याचा परिणाम सर्वसामान्यांवर होतो. अनेक जण प्रतिष्ठेसाठी कर्ज काढून खर्च करतात. यामध्ये नाहक पैसा वाया जातो. या सगळ्याचा मराठा समाजाने सारासार विचार करून सिद्धेश्वर व भार्जे पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सर्वसाधारण सभेत सर्वांनुमते दारू व डीजे बंदीचा निर्णय घेतला.

एखादी व्यक्ती दारू पिऊन आल्यास त्याला संबंधित मंडळी जबाबदार राहणार नाही. मात्र अशा व्यक्तीने तंटा केल्यास गाव कमिटीने त्या व्यक्तीला किंवा नातेवाइकांना समजावून विषय शांततेत मिटवेल, असे ठरले. सर्वसाधारण सभेत मराठा समाज २१ गणपती सिद्धेश्वर भार्जे विश्वस्त कमिटी अध्यक्ष रमेश साळुंखे, उपाध्यक्ष अमृत पोंगडे, सेक्रेटरी गणेश दळवी, खजिनदार शंकर शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. समाजाने चांगले पाऊल उचलले आहे, आता फक्त त्याचे सर्वांनी पालन करण्याची गरज आहे.

गेल्या ४० वर्षांपासून लग्नात डीजे आणि दारू नको यासाठी समाजात प्रबोधन करत आहे. आता अनेक समाज यासाठी पुढे येत आहेत, हे पाहून खूप समाधान होत आहे. आगामी काळात कुप्रथा हद्दपार होतील, असे वाटते. यासाठी अनेकांचे योगदान असणार आहे.

- प्रा. एल. बी. पाटील, साहित्यिक

लग्न समारंभात दारू आणि डिजेमुळे पैसा वाया जातो. ज्याची ऐपत नाही त्याला कर्जबाजारी व्हावे लागते. अनेक तरुण मुले यामुळे व्यसनाच्या आहारी जातात. त्यामुळे ही प्रथा बंद करण्याचा निर्णय ११ गावांनी सर्वानुमते घेऊन विधायक पाऊल टाकले आहे. संपूर्ण सुधागड तालुक्यात यासंदर्भात जनजागृती करत आहोत.

- गणपत सीतापराव, अध्यक्ष, सुधागड तालुका मराठा समाज

Web Title: Pali Sudhagad Wine Dj Restricted 11 Villages

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsWine