"'महाराष्ट्र वसूली आघाडी' राज्याचा कारभार चालवतंय"

uddhav-thackeray-sad
uddhav-thackeray-sad

महाराष्ट्रात सध्या सचिन वाझे प्रकरण (Sachin Waze Case) गाजतंय. सुरूवातीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली. त्यानंतर त्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणांमध्ये वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक झाली. पाठोपाठ त्यांचं निलंबनही झालं. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाली. पण बदलीनंतर पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. त्यात, 'गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला बार आणि इतर आस्थापनांकडून महिन्याचे १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिलं होतं' असं नमूद केलं. या आरोपानंतर राज्यातील सरकारवर टीकेची झोड उठली. याच मुद्द्यावरून भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्याने ठाकरे सरकारचा उल्लेख महाराष्ट्र वसूली आघाडी करत टोला लगावला.

"मला असं वाटतंय की महाराष्ट्र राज्याचं सरकार हे 'महाराष्ट्र वसूली आघाडी' चालवतंय. गृहमंत्री स्वत: राष्ट्रवादी पक्षाच्या एका नेत्याचे आदेश ऐकतात ही बाब शरमेची आहे. गृहमंत्र्यांची कॅबिनेटमधून तात्काळ हकालपट्टी करा आणि या साऱ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा", अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय महासचिव सीटी रवी यांनी एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले.

परमबीर सिंह यांनी पत्रातून गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केले. त्यावर बोलताना, "परमबीर सिंग यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. हे आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावेत. अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. मी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे", असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपलं मत मांडलं. "गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतचा निर्णय सर्वांशी बोलून उद्यापर्यंत घेऊ. त्याआधी त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ. या सर्व प्रकरणाचा सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. पत्रकार परिषदेआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून उद्या पुन्हा त्यांच्याशी चर्चा करणार आहे", असं यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मत व्यक्त केलं. "शरद पवार आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्याने त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले. पण अशाच प्रकारे तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल आणि कमिशनर इंटेलिजन्स रश्मी शुक्ला यांच्या बदल्या झालेल्या नसतानाही त्यांनी पुराव्यांच्या आधारे गृहमंत्रालयात सुरु असलेल्या गैरप्रकारांबाबत अहवाल तयार केला होता आणि त्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्याचवेळी यासंदर्भात योग्य कारवाई झाली असतील तर आज ही वेळ आलीच नसती", असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

Param Bir Singh Letter Bomb Anil Deshmukh Sharad Pawar BJP Devendra Fadnavis

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com