लेटरबॉम्ब : परमबीर सिंह यांच्या खळबळजनक पत्रातील १० महत्त्वाचे मुद्दे

लेटरबॉम्ब : परमबीर सिंह यांच्या खळबळजनक पत्रातील १० महत्त्वाचे मुद्दे

Parambir Singh Letter : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या विस्फोटकासह स्कॉर्पियो गाडीनंतर परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदांवरुन हचवण्यात आलं होतं. त्यांनतर परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांच्या गौप्यस्फोटानंतर पत्रानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.   गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे उद्दिष्ट दिले होते, असा खळबळजनक परमबीर सिंग यांन आपल्या आठ पानाच्या पत्रात केला आहे. दरम्यान, गृहमंत्री देशमुख यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत स्वतःचा बचाव करण्यासाठी परमबीर सिंग खोटा आरोप करत असल्याचे म्हटले आहे. पाहूयात परमबीर सिंग यांच्या पत्रातील महत्वाच्या १० गोष्टी .... 

महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम २२ एन (२) अंतर्गत माझी बदली झाली. प्रशासकीय अत्यावश्यकतेमुळे बदली करण्यात आल्याचं कारण देण्यात आलं. माझा विश्वास आहे की या बदलीचे कारण सरकारने नोंदवले असेल. अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटकाच्या घटनेबद्दल स्वतंत्र आणि निःपक्षपाती चौकशीची खात्री करुन घेतली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर उभा असलेल्या गाडीमध्ये स्पोटक सापडल्याप्रकरणी २५ फेब्रुवारी रोजी ग्रामदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास NIA आणि ATS कडे होता. या तपासासाठी माझ्याकडून आणि माझ्या कार्यालयाकडून NIA आणि ATS ला जे काही सहाय्य गरजेचं होतं ते वेळोवेळी करण्यात आलं.

गृहमंत्र्यांनी १८ मार्च २०२१ रोजीच्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबई पोलीस आणि माझ्यावर गंभीर आरोप केले होते. यामध्ये त्यांनी अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटकाप्रकरणी तपास व्यवस्थित होत नसल्याचा आरोप केला होता. तसेच माझ्या चुका क्षमा करण्याच्या लायकीच्या नसल्याचेही त्यांनी म्हटलं होतं.  


सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्स युनिटचे (सीआययू) प्रमुख म्हणून काम करत होते. गेल्या काही महिन्यांत गृहमंत्री देशमुखांनी अनेक वेळा वाझेंना त्यांच्या "ज्ञानेश्‍वरी' या निवासस्थानी बोलवले आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितले. फेब्रुवारी महिन्यातही वाझेंना त्यांच्या निवासस्थानी बोलावून देशमुखांनी ही सूचना केली. त्या वेळेस देशमुखांचे खासगी सचिव पलांडे हेही तिथे हजर होते.

एवढेच नव्हे, तर 100 कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचे हेही देशमुखांनी सांगितले. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले, की मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये गोळा केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर स्रोतांकडून जमा करता येईल. 

परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रांमध्ये एसपी पाटील नावाच्या एका पोलिस आधिकाऱ्यासोबत झालेल्या बातचितीचं वर्णही केलं आहे.  परमबीर आणि पाटील यांच्यामध्ये १६ मार्च आणि १९ मार्च रोजी संभाषण झालं होतं. पाहा काय झालं होतं... 

१६ मार्च रोजी झालेलं संभाषण : 

  • परमबीर सिंह : पाटील तू गृहमंत्री आणि पालांडे यांना फेब्रुवारीत भेटला तेंव्हा किती बार,  रेस्टॉरंट्स आणि इतर ठिकाणे त्यांनी सांगितली होती 
  • परमबीर सिंह : आणि एकूण किती पैसे जमा करायला सांगितले होते. 
  • परमबीर सिंह : जरा पटकन...
  • ACP पाटील : मुंबईतील १ हजार ७५० बार्स, रेस्टॉरंट्स आणि इतर काही बाबी. प्रत्येकी ३ लाख रुपये
  • ACP पाटील :  महिन्याकाठी एकूण ५० कोटी जमा झाले पाहिजेत
  • परमबीर सिंह : आणि वाझे भेटलेले ती तारीख काय होती 
  • ACP पाटील :  सर मला तारीख नक्की आठवत नाही 
  • परमबीर सिंह : तुम्ही म्हणालात तुमच्या भेटीआधी काही दिवस 
  • ACP पाटील : हो सर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी 

१९ मार्च रोजी झालेलं संभाषण : 

  • परमबीर सिंह : पाटील मला आणखी काही माहिती हवी आहे 
  •  परमबीर सिंह : गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर तुला वाझे भेटले होते का ? 
  •  ACP पाटील :  हो सर गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर वाझे मला भेटले होते
  • परमबीर सिंह : गृहमंत्र्यांनी का बोलावलं, ते तुला सांगितलं का ? 
  • ACP पाटील :  त्यांनी मला सांगितलं भेटीचे कारण, १ हजार ७५० ठिकाणांहून ३ लाख रुपयांप्रमाणे महिन्याकाठी ४० ते ५० कोटी जमा करायला सांगितले होते. 
  • परमबीर सिंह : अरे ! हे तुला जे सांगितलं तेच त्याला देखील सांगितलं 
  • ACP पाटील :  चार मार्चला त्यांचा सहाय्य्क पलांडे यांनीही मला हेच सांगितलं
  • परमबीर सिंह : म्हणजे पलांडे यांना तू ४ मार्चला भेटलास 
  • ACP पाटील :  हो सर मला बोलावलं होतं 

मोहन डेलकर यांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची चौकशी दादरा, नगर-हवेली पोलिसांनी करायला हवी. कारण त्यांनी आत्महत्या जरी मुंबईत केली असली, तरी त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या घटना दादरा, नगर-हवेली येथे घडल्या. कायदेशीर बाजू तपासल्यानंतर मी हे मत व्यक्त केले; मात्र त्यावर अनिल देशमुखांनी मुंबईतच आत्महत्येसाठी प्रवृत्त झाल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकला आणि परस्पर याप्रकरणी एसआयटीची विधानसभेत घोषणा केल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे. 
 
परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करण्याचा गंभीर आरोप केला आहे. मुंबई पोलिस आयुक्त म्हणून  वर्षभर कामकाज पाहिलं. त्या अनुभवाच्या आधारावर सांगतोय की, गृहमंत्री माझ्या काही अधिकाऱ्यांना परस्पर बैठकीसाठी बोलवतात आणि त्यांना फंड गोळा करण्याचे निर्देश देतात. ही गोष्ट अवैध आणि घटनेला अनुसरुन नाही. या सर्व बैठकींची कल्पना मला माझे अधिकारी द्यायचे. गृहमंत्री पोलिसांच्या कारभारात प्रचंड ढवळाढवळ करत. हा असला राजकीय हस्तक्षेप घटनेला बाधा आणणारा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाविरुद्ध आहे.

आयुक्त म्हणून विनम्रतापूर्वक पोलिस दलाची संपूर्ण जबाबदारी घेतोय. पण, राजकीय हस्तक्षेपामुळे काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत. याची जबाबदारी त्या चुकीच्या व्यक्तींकडे जाते. माझ्या विरोधात कोणताही पुरवा अथवा साक्षीदार नाही. माझ्याविरोधात कोणताही पुरवा मिळला नाही किंवा माझ्यावर कोणतेही आरोप करण्यात आले आहेत.  अंदाज, शंका आणि शुद्ध अनुमान वगळता माझ्याविरोधात कुठल्याही प्रकारचा पुरवा, तपशील सापडला नाही.  सचिन वाझेचे कॉल रिकॉर्ड्स आणि फोन डेटाची चौकशी व्हायला हवी. त्यामुळे गुन्हागारांचं सत्य बाहेर येईल.   

भारताचा खरा नागरिक म्हणून मी गेली 32 वर्षे पोलिस अधिकारी म्हणून घेतलेल्या शपथेला जागलो आहे. या कार्यकाळात मला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.  पत्राच्या अखेरीस परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्रांना विनंती केली आहे. यामध्ये ते म्हणालेत की, मी तुम्हाला नम्रपणे पोलिस दलातील वास्तविक चित्राबद्दल जागरूक केलं आहे. जेणेकरून आपण त्याबद्दल विचार करावा आणि सुधारात्मक कारवाई करावी. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com