esakal | महत्वाची बातमी| नातवाला भेटू न दिल्यास पालकांना दंड - मुंबई उच्च न्यायालय
sakal

बोलून बातमी शोधा

महत्वाची बातमी| नातवाला भेटू न दिल्यास पालकांना दंड - मुंबई उच्च न्यायालय

महत्वाची बातमी| नातवाला भेटू न दिल्यास पालकांना दंड - मुंबई उच्च न्यायालय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पहिल्या पतीच्या मुलाला त्याच्या आजी-आजोबांच्या भेटीपासून वंचित ठेवणाऱ्या सुनेला मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. नातवाला आजी-आजोबांची भेट घडवण्यात कसूर केली, तर पाच हजार रुपये दंड भरण्यास सांगणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेशही उच्च न्यायालयाने कायम ठेवला. आजी-आजोबांना नातवाला भेटू न देणे अयोग्यच आहे, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले. मुलाची भेट आजी-आजोबांशी होऊ नये, अशा मागणीसाठी आईने उच्च न्यायालयात याचिका केली होती.

उद्या उद्धव ठाकरे भेटणार नरेंद्र मोदींना, वाचा काय आहे कारण...

मुंबईत राहणाऱ्या आणि उच्चशिक्षित असलेल्या मानसी दिवे (नाव बदलले आहे) यांनी न्यायालयात याचिका केली आहे. मुलाची भेट आजी-आजोबांशी होऊ नये, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांचा विवाह १२ वर्षांपूर्वी झाला; मात्र लग्नानंतर अडीच वर्षांत त्यांच्या पतीचे निधन झाले. त्या वेळेस त्यांचा मुलगा चार महिन्यांचा होता. त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला. आपल्या नातवाची भेट व्हावी आणि तो आपल्याबरोबर कायम संपर्कात असावा, अशा हेतूने त्याच्या दिल्लीत राहणाऱ्या आजी-आजोबांनी वारंवर प्रयत्न केले; मात्र याचिकादाराने त्याबाबत नकार कळवला. त्यामुळे आजी-आजोबांनी कुटुंब न्यायालयात दावा दाखल करून नातवाची भेट अधेमधे व्हावी अशी मागणी केली होती. त्यांची मागणी कुटुंब न्यायालयाने मान्य केली आणि जेव्हा आजी-आजोबा मुंबईत येतील तेव्हा त्यांना न्यायालयाच्या आवारातच काही तासांसाठी आईच्या उपस्थितीत भेटण्याची परवानगी दिली. तसेच जर आईने भेटण्यास नकार दिला, तर तिला पाच हजार रुपयांचा दंडही भरावा लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्या निर्णयाविरोधात आईने उच्च न्यायालयात याचिका केली होती. याचिकेवर न्या. शाहरूख काथावाला आणि न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

मुंबईची पोरं जगात भारी, बातमी वाचाल तर खुश व्हाल...

सासू-सासऱ्यांनी माझा छळ केला, त्यामुळे त्यांना माझ्या मुलाने भेटू नये, अशी माझी इच्छा आहे, असे तिच्या वतीने सांगण्यात आले. सुनेच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद न्यायालयाने अमान्य केला. स्वतःचा छळ केला म्हणून मुलाला भेटू द्यायचे नाही, या विधानामध्ये तथ्य नाही. त्याबाबतचे पुरेसे कारणही स्पष्ट होत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. नातू आतापर्यंत आजी-आजोबांना भेटू शकला नाही हीदेखील याचिकादार आईची चूक आहे आणि अशाप्रकारे ती वर्तन करू शकत नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.