प्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षाचा पर्याय! - जयंत सिन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

मुंबई - प्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षा म्हणजे ड्रोनचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उबरसारख्या कंपन्यांशी चर्चाही सुरू असून, काटेकोर नियम तयार केले जात आहेत, अशी माहिती हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली. 

मुंबई - प्रवासी वाहतुकीसाठी एअर रिक्षा म्हणजे ड्रोनचा वापर करण्याबाबत केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उबरसारख्या कंपन्यांशी चर्चाही सुरू असून, काटेकोर नियम तयार केले जात आहेत, अशी माहिती हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली. 

ग्लोबल एव्हिएशन समिटमध्ये आज ड्रोन विषयीच्या परिसंवादात ते बोलत होते. ‘‘ऑटो रिक्षा ते एअर रिक्षा हे परिवर्तन सहज शक्‍य आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेले काटेकोर नियम, निकष व यंत्रणा तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रवासी ड्रोनचा कायदेशीर आणि सुरक्षित वापर करण्यासाठी योग्य यंत्रणा गरजेची आहे. त्याबाबत ‘डिजिटल स्काय फ्रेमवर्क’ तयार केले जात आहे. देशी-परदेशी भागीदारीतून या तंत्रात भारत जगात अग्रेसर होईल,’’ असे सिन्हा यांनी सांगितले. त्यामुळे देशी-विदेशी उद्योगांनी या क्षेत्रातील भागीदारीसाठी आपले तंत्रज्ञान व गुंतवणूक आणावी, असेही आवाहन त्यांनी केले. 

‘‘मानवरहित टेहळणी ड्रोन आणि प्रवासी किंवा मालाच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे ड्रोन यांच्याकरिता वेगवेगळे नियम असतील. ड्रोनच्या वापराबाबत आराखडा (डिजिटल स्काय फ्रेमवर्क) करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, असे आराखडे अनेक राज्यांनी तयार केले आहेत,’’ असे सिन्हा यांनी सांगितले. 

‘‘भारतात ड्रोन संचालनासाठी अनेक वैमानिक आणि सेवा पुरवठादारांनी अर्ज केले आहेत. परंतु, उत्पादकांनी अद्याप ड्रोनचे सेवायोग्यता (फिटनेस) प्रमाणपत्र घेतलेले नाही. भारतात हजारो अवैध ड्रोन ‘ऑपरेटर’ आहेत. त्यांनी सॉफ्टवेअर अद्ययावत करून वैधता घ्यावी,’’ असे ते म्हणाले. 

ड्रोनच्या वापरासाठी ‘ग्रीन झोन’, ‘यलो झोन’ व ‘रेड झोन’ अशी क्षेत्रे असतील. ‘रेड झोन’मध्ये राष्ट्रपती भवन, विमानतळानजीकचा पाच किलोमीटरचा पट्टा व अन्य महत्त्वाची ठिकाणे असतील. ‘डिजिटल स्काय फ्रेमवर्क’मुळे हे भाग स्पष्ट होतील. मोठ्या ड्रोनचे नियंत्रण सेवा पुरवठादारांकडे आणि हवाई वाहतूक नियंत्रकाकडेही असेल. निर्धारित मार्ग सोडून अन्यत्र गेल्यास ड्रोनचे नियंत्रण आपोआप हवाई वाहतूक नियंत्रकाकडे जाईल, अशी माहिती जयंत सिन्हा यांनी दिली.

पाच वर्षांत प्रवासी ड्रोन
‘‘प्रवासी वाहतूक करणारे ड्रोन म्हणजे दोन ते चार प्रवासी क्षमतेची छोटी हेलिकॉप्टर सुरवातीला वैमानिकामार्फत चालवली जातील. त्यानंतर या प्रवासी ड्रोनचे संचालन वैमानिकाविना केले जाईल. ही प्रवासी ड्रोन दोन हजार फूट उंचीवरून ताशी १५० ते २०० किलोमीटर वेगाने उडतील. ड्रोनमधून प्रवासी वाहतूक पाच वर्षांत सुरू होण्याची शक्‍यता आहे,’’ असे जयंत सिन्हा यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passenger Transport Air Rickshaw Option Jayant Sinha