अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा केला प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा केला प्रयत्न

अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला; अ‍ॅसिड फेकण्याचा केला प्रयत्न

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात Anurag Kashyap लैंगिक शोषणाचे आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष Payal Ghosh हिच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी अॅसिड फेकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पायलने केला आहे. खुद्द पायलने व्हिडीओ पोस्ट करत ही धक्कादायक माहिती दिली. मुंबईतील अंधेरी परिसरात ती राहते. घरातून निघून कारमध्ये बसताना तिच्यावर काही जणांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी चेहरा मास्कने झाकल्यामुळे तिला त्यांची ओळख पटू शकली नाही. पायलवर हल्ला केल्यानंतर काही सामान हिसकावून त्यांनी तिथून पळ काढला.

"मी काही औषधं विकत घेण्यासाठी घरातून बाहेर पडली. माझ्या गाडीत बसण्याचा प्रयत्न करताना अचानक काही अज्ञातांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांच्या हातात एक बाटली होती. त्यात नेमकं काय होतं माहित नाही. पण त्या बाटलीत अॅसिड असल्याचा मला संशय आहे. त्यांनी माझ्यावर रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बचावासाठी मी ओरडले तेव्हा त्यांच्या हातातील रॉड माझ्या डाव्या हातावर पडला आणि मी जखमी झाले. मी जोरजोरात ओरडले तेव्हा त्यांनी तिथून पळ काढला," असं पायल तिच्या व्हिडिओत म्हणाली.

हेही वाचा: ..तेव्हा कपूर कुटुंबानेही आईकडे पाठ फिरवली होती- करीना कपूर

अनुराग कश्यपवर केले होते आरोप

"अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं. त्याने मला वाईट पद्धतीची वागणूक दिली. त्याच्याविरोधात कारवाई करा. ज्यामुळे या माणसाचं खरं रुप जगासमोर येईल. कृपया माझी मदत करा", असं ट्विट तिने केलं होतं. इतकंच नव्हे तर नंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटमध्ये टॅग करत सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. अनुरागविरोधात पायलने पोलीस स्थानकांत बलात्कार आणि लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती.

कोण आहे पायल घोष?

पायलने २०१७ मध्ये 'पटेल की पंजाबी शादी' या चित्रपटात अभिनेते परेश रावल यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्ये पायलने विशेष कामगिरी केली नाही. तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. त्याचसोबत तिने 'साथ निभाना साथिया २' या हिंदी मालिकेत काम केलं होतं.

loading image
go to top