पेण अर्बन बँकेचा प्रश्न फास्ट ट्रॅक कोर्टात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pen Urban Bank issue in fast track court ed  Kirit Somaiya mumbai

पेण अर्बन बँकेचा प्रश्न फास्ट ट्रॅक कोर्टात 

पेण : पेण अर्बन बँकेच्या मालमत्तांवरील ताबा सोडण्याची तयारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दर्शविली आहे. लवकरच याबाबतची प्रक्रिया पूर्ण होणार असून हजारो लहान ठेवीदारांना दिलासा मिळणार आहे. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पेणमधील पत्रकार परिषदेत सांगितले. सोमय्या यांनी पेण बँकेला सोमवारी (ता. १४) भेट देत प्रशासनासह ठेवीदारांबरोबर चर्चा केली. या वेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पेण अर्बन बँकेतील ७५८ कोटींच्या घोटाळाप्रकरणी १२ वर्षांनंतरही हजारो ठेवीदारांना न्याय मिळालेला नाही.

अमित शहा यांच्या प्रयत्नाने सहकार खाते आणि बँकांनी नवीन सुधारणा केल्याने ९० दिवसांत आर्थिक व्यवहार सुरू झाले आहे. त्यामुळे मोठ्या ठेवीदारांचे नुकसान न होत १७९ कोटी रुपये बँकेला प्राप्त करून देण्यासाठी रिझर्व्ह बँक, केंद्र सरकार, सहकार खाते यांच्या वाटाघाटी सुरू आहेत. काही जप्त करण्यात आलेल्या जमिनीची परस्पर विक्री होत आहे. बँकेच्या एक लाख ६० हजार छोट्या ठेवीदारांना एक लाख रुपये परत मिळू शकतात. उर्वरित एक लाखापेक्षा अधिक ठेव असणाऱ्या पाच हजार खातेधारकांसाठी पैसे देण्यासाठी उर्वरित १०० कोटींच्या संपत्तीची विक्री करण्यात येणार आहे. त्यामधून त्यांना पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम परत देण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार रवीशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, अर्बन बँक संघर्ष समितीचे नरेन जाधव, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, ललित पाटील आदी उपस्थित होते.