हजार परत मिळवण्याच्या नादात लाख गमावले   

हजार परत मिळवण्याच्या नादात लाख गमावले   

मुंबई : नोकऱ्यांबाबत माहिती देणाऱ्या एका संकेतस्थळावर भरलेले शुल्क परत मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाच्या डेबिट कार्डची माहिती आणि ओटीपी मिळवून भामट्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. काही हजार रुपये परत मिळवण्याच्या नादात मालाड येथील मनीष महाडिक या तरुणाने दोन लाख 39 हजार रुपये गमावले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोन भामट्यांना बेड्या ठोकल्या असून, पुढील तपास सुरू आहे. न्यायालयाने या दोघांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे आरोपीही संबंधित कंपनीच्या परिसरातच वावरत होता. 

मनीष महाडिक याने 2017 मध्ये नोकरी मिळवण्यासाठी एका संकेतस्थळावर शुल्क भरले होते. नोव्हेंबरच्या सुरुवातीला त्याला एक दूरध्वनी आला. आपण या संकेतस्थळाचे कर्मचारी असून, भरलेले शुल्क परत मिळवून देऊ असे सांगण्यात आले. पैसे परत मिळतील या अपेक्षेने मनीषने त्या व्यक्तीला आपला डेबिट कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही क्रमांक आणि ओटीपी अशी सर्व माहिती दिली. त्यानंतर थोड्याच वेळात त्याच्या बॅंक खात्यातून दोन लाख 39 हजार रुपये काढण्यात आल्याचे समजले. आपली फसगत झाल्याचे समजल्यावर त्याने 13 नोव्हेंबरला मालाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

या तक्रारीनुसार पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर लक्ष ठेवले. डिसेंबरमध्ये हा मोबाईल क्रमांक दिल्लीत सुरू असल्याचे समजले. त्यानंतर मालाड पोलिसांच्या सायबर सेलसह पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले. हा मोबाईल क्रमांक वापरणाऱ्या 35 वर्षांच्या तरुणाला 15 डिसेंबरला पोलिसांनी विकासपुरी परिसरातील केशवपुरी गावाजवळून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिस पीतमपुरा भागातील 28 वर्षांच्या तरुणापर्यंत पोहोचले. त्याचा मोबाईल तपासल्यावर पोलिसांना अधिक माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी या दोघांनाही सायबर कायदा व अन्य कायद्यान्वये अटक केली. 

सूत्रधारही रडारवर 

या फसवणुकीतील सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही; मात्र तोही रडारवर आहे. त्याने दिल्लीतील अनेक भागांत बनावट कॉल सेंटर्स तयार केली आहेत. या कॉल सेंटरवरून ऑनलाईन माहिती मिळवून नोकरीसाठी भरलेले शुल्क परत मिळवून देण्याचा किंवा खासगी कंपन्यांकडून कर्ज मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले जात होते. नागरिकांच्या बॅंक खात्यांची माहिती मिळवून फसवणूक केली जात होती. विशेष म्हणजे आरोपीही संबंधित कंपनीच्या परिसरातच वावरत होता. पोलिसांनी पहिल्या आरोपीवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याचा मोबाईल संबंधित कंपनीच्या कार्यालयाच्या परिसरातच सुरू असल्याचे दिसत होते. 

उत्तर प्रदेशातील सिम कार्ड 
या फसवणुकीसाठी वापरलेले सिम कार्ड उत्तर प्रदेशातून मिळवण्यात आले होते. लुटीतील रक्कम वेगवेगळ्या वॉलेटमध्ये वळवण्यात येत होती. त्यानंतर स्थानिक मनी ट्रान्स्फर दुकानदारांकडून रोख स्वरूपात पैसे घेतले जात होते. 

WebTitle : penny wise pound foolish this has exactly happened with person in mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com