हौशे, नवशे आणि गवशांची म्हसा यात्रेत मौजमजा

मुरबाडपासून 12 किमी अंतरावर असलेल्या म्हसा यात्रेत झालेली गर्दी
मुरबाडपासून 12 किमी अंतरावर असलेल्या म्हसा यात्रेत झालेली गर्दी

मुंबई : महाराष्ट्रात गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि हौशे, नवशे अन्‌ गवशे यांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या म्हसा यात्रेत रविवारी प्रचंड गर्दी झाली होती. यात्रेकरूंनी यात्रेचा मनमुराद आनंद लुटला. यात्रेत यंदा प्रथमच लंडनमधील एक पाहुणा हातात बांबूची काठी घेऊन भिरभिरत्या नजरेने यात्रेतील गर्दी आणि विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंचे निरीक्षण करताना दिसत होता. त्याला एका कुटुंबाने खास म्हसाची यात्रा पाहायला आणले होते. यात्रेत सहभागी झालेली मंडळीही परदेशी पाहुण्याकडे कुतूहलाने पाहत त्याचे स्वागत करीत होती.

हेही वाचा : ​ठाणे स्थानकातील एसी शाैचालयाला टाळे

आकाशपाळणे, मौत का कुआँ आदी विविध प्रकारची मनोरंजनाची साधने, शेतीसाठी उपयुक्त असणारी अवजारे, बच्चे कंपनीसाठी विविध प्रकारची खेळणी, महिलांसाठी संसारोपयोगी वस्तू आणि भांडी, एरवी बाजारात सहजासहजी न मिळणाऱ्या बांबूच्या रंगीत टोपल्या, सुपे आदींची खरेदी करत व खाऊगल्लीतील विविध पदार्थांवर ताव मारत मुलाबाळांसह आलेल्या यात्रेकरूंनी मौजमजा केली.
 
धक्कादायक : मुंबईत 90 रुपयांत विकला जातोय मृत्यू
 ​
गुरांच्या बाजारात शेतकरी व बैलांच्या चाहत्यांची खरेदीसाठी भटकंती सुरू होती. म्हसा गावाच्या चोहोबाजूला खास मांसाहार करण्यासाठी आलेले यात्रेकरू माळरानावर बसून जेवणावर ताव मारत होते. काहींनी तिथेच दगडाच्या चुली मांडून सहकुटुंब भोजनाचा आनंद लुटला. म्हसा यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 48 सीसी टीव्ही कॅमेरे सज्ज ठेवण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला. 

नेत्यांची मांदियाळी 
म्हसा यात्रेच्या निमित्ताने मतदारांशी जवळीक साधण्यासाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजन समारंभात खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे सहभागी झाले होते. रविवारी सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या फार्म हाऊसवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि शिवसेनेतर्फे आयोजित स्नेहभोजनासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com