नॉवेल कोरोना COVID19 च्या भीतीने कस्तुरबा परिसरातील रहिवाशी म्हणतायत...

मिलिंद तांबे
बुधवार, 18 मार्च 2020

कस्तुरबा रुग्णालय परिसरातील रहिवासी चिंताग्रस्त ; निर्जंतुकीकरण, स्वच्छता करण्याची मागणी 

मुंबई : कोरोना संसर्गबाधितांवर महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून, विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. या परिसरात कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांचा वावर असल्याने रहिवासी भयभीत झाले आहेत. महापालिकेने वसाहतींमध्ये निर्जंतुकीकरण करावे आणि स्वच्छतेवर अधिक भर द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

COVID19 - 'ती' एक टॅक्सी 'कोरोना' घेऊन फिरत होती मुंबईच्या रस्त्यांवरून...

महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात पाच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, 15 संशयित रुग्ण दाखल आहेत. या रुग्णालयात कोरोना विषाणूची चाचणी करणारी प्रयोगशाळा आहे. त्यामुळे कोरोनाबाधित आणि संशयित रुग्णांना येथे आणले जाते. रुग्णालयाशेजारी ब्रह्मा, आशीर्वाद, समाधान, विनायक वासुदेव चाळ, ऍस्टर आदी इमारतींमध्ये सुमारे 1200 नागरिक राहतात. रुग्णालयातील कोरोनाबाधितांमुळे आपल्याला संसर्ग होईल, अशी भीती तेथील रहिवासी व्यक्त करत आहेत. 

कोरोनाबाधित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाल्यापासून आपले कुटुंब भीतीच्या सावटाखाली असल्याचे ब्रह्मा संकुलातील रहिवासी रणजित कांबळे यांनी सांगितले. तशीच भावना विनायक वासुदेव चाळीतील विजया वाळुंज यांनी व्यक्त केली. कस्तुरबा रुग्णालयाच्या मागील बाजूस कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. या परिसरात वाहने उभी केली जातात; तसेच कचरा पडलेला असतो. त्यामुळे रहिवासी घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत, असे सिद्धेश मोरे म्हणाले. 

COVID19 - 'हा' रिपोर्ट वाचा आणि कोरोनाबद्दलची भीती मनातून काढून टाका

शंकांचे निरसन आवश्‍यक 

कस्तुरबा रुग्णालय परिसरातील रहिवाशांच्या मनातील शंकांचे निरसन करणे गरजेचे आहे. परिसरात कोरोनाबाबत जनजागृती करणे आवश्‍यक आहे. परिसरातील संकुलांचे निर्जंतुकीकरण आणि साफसफाई केली पाहिजे. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन रहिवाशांच्या मनातील भीती दूर करावी; आम्ही रहिवासीही महापालिकेला सर्वतोपरी मदत करू, असे सुभाष तळेकर यांनी सांगितले. 

people from mumbais kasturba hospital demands for extra cleaning in the area


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people from mumbais kasturba hospital demands for extra cleaning in the area