esakal | 'हा' रिपोर्ट वाचा आणि कोरोनाबद्दलची भीती मनातून काढून टाका
sakal

बोलून बातमी शोधा

'हा' रिपोर्ट वाचा आणि कोरोनाबद्दलची भीती मनातून काढून टाका

'हा' रिपोर्ट वाचा आणि कोरोनाबद्दलची भीती मनातून काढून टाका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोना संसर्ग पूर्णतः नियंत्रणात आहे. या संसर्गाला आला घालण्यासाठी आवश्‍यक ती सर्व पावले प्रशासनाकडून उचलण्यात आली आहेत. प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करून लोकांनी सहकार्य कारावं. कोरोना संसर्ग रोखणे शक्‍य असल्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी सांगितले. कोरोना संसर्ग, त्याचा होणारा प्रसार, प्रशासकीय उपाययोजना यावर प्रतिनिधी मिलिंद तांबे यांनी केलेली बातचीत .... 

प्रश्न - कोरोना विषाणू म्हणजे नेमकं काय ? 

उत्तर - करोना हे विषाणूच्या एका समूहाचं नाव आहे. साध्या सर्दी खोकल्यापासून ते सार्स (Severe Acute Respiratory Syndrome) किंवा मर्स (Middle East Respiratory Syndrome ) यासारख्या गंभीर आजारासाठी करोना विषाणू कारणीभूत असतात. परंतु यावेळी वुहान शहरात जो करोना विषाणू आढळून आला तो मात्र यापूर्वी आढळलेल्या करोना विषाणू पेक्षा वेगळा आहे कारण त्याची जनुकीय रचना इतर कोणत्याही पूर्वीच्या करोना विषाणूंशी मिळतीजुळती नाही त्यामुळेच या नव्या विषाणूला नोवेल करोना वायरस 2019 (nCov 2019) असे नामाभिधान प्राप्त झाले. या आजाराला जागतिक आरोग्य संघटनेने COVID-19 असे नाव दिले आहे. 

प्रश्न - या आजाराची नेमकी लक्षणे काय आहेत? 

उत्तर - नवीन करोना विषाणू आजाराची लक्षणे 
ही मुख्यत्वे श्वसनसंस्थेचे निगडीत असतात ती सर्वसाधारणपणे इन्फ्लुएन्झा आजारा सारखीच असतात. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया, काहीवेळा मूत्रपिंड निकामी होणे अशी लक्षणे मुख्यत्वेकरून आढळतात. या आजारास जागतिक आरोग्य संघटनेने कोविड -19 असे नाव दिले आहे. 

#COVID19 - १०० टक्के 'वर्क फ्रॉम होम'ला कॉर्पोरेट सेक्टरचा होकार; CSR फंडातून होणार सरकारला मदत

प्रश्न - हा नवा विषाणू माणसांमध्ये कसा आला ? 

उत्तर - हा नवा विषाणू माणसांमध्ये कसा आला या बद्दल अनेक तर्क-वितर्क सुरु आहेत. मात्र अद्याप निश्‍चित, खात्रीलायक काहीच माहिती नाही. मूळात करोना विषाणू प्राणीजन्य आहे. म्हणजे करोना विषाणूचे मूळ स्थान प्राणी जगतात आहे. वटवाघळांमध्ये हा विषाणू मुख्यत्वे आढळतो. 2012 ला पसरलेला मर्स हा आजार उंटाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना होताना आपण पाहिले आहे तर 2003 च्या सार्समध्ये विशिष्ट जातीचे मांजर आपल्याला आडवे गेले होते. अनेकांनी ही सध्याची करोना साथ म्हणजे बायोटेरिरजमचा प्रकार असावा, अशी शंकादेखील व्यक्त केलेली आहे. पण या कॉन्स्पिरसी थेरीला आज तरी कोणता भक्कम आधार नाही. 

प्रश्न - अनेक संसर्गजन्य आजारांचं उगम हे चीन मध्येच का होतं ? 

उत्तर - सार्स असो की बर्ड फ्ल्यू .. चीन अनेक नव्या विषाणूंची जन्मभूमी राहिला आहे. अनेकदा चीनमध्येच अशा साथी का सुरु होतात, यालाही काही शास्त्रीय कारणे आहेत. जगाची सुमारे दीड अब्ज लोकसंख्या आणि एकूण जगाच्या निम्मे पशुधन चीनमध्ये आहे. चीनमधील खाद्यसंस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रदेशातील मांसाहारातील वैविध्य लक्षणीय आहे. जवळपास एकशेवीस वेगवेगळे प्राणी ही मंडळी आपल्या आहारात घेतात. प्राण्यांचे रक्त, मांस पुरेशी काळजी न घेता हाताळल्याने असे विषाणू मानवी जगतात शिरकाव करण्याचे अपघात घडण्याची शक्‍यता वाढते. हे केवळ चीनमध्ये घडते असे नाही. चिंपाझीचे मांस खाण्याच्या सवयीमुळे आफ्रिकेत इबोला आला, हे आपण पाहिलेच आहे. वाढती जंगलतोड, पूर्वीच्या जंगल प्रदेशात मानवी वसाहत होणे या आपल्या मूर्खपणामुळे आपण जणू एक पर्यावरणीय खिडकी उघडतो आणि आपल्याभोवतीचे सूक्ष्मजीव ही संधी नेमकी हेरतात. वुहान सारख्या शहरातील मोठाली ऍनिमल मार्केट ही जणू सूक्ष्मजीव देवाणघेवाणीची आणि जनुकीय बदलाची केंद्रे बनतात आणि जगाला हादरवणा-या साथी इथं जन्माला येतात. आजमितीला नव्याने येणारे सुमारे पासष्ट टक्के आजार हे प्राणीजन्य आहेत. मानव, प्राणी आणि पर्यावरण या सा-यांचे आरोग्य वेगवेगळे नसून ते एकच आणि परस्परावलंबी आहे, ही " वन हेल्थ' ची संकल्पना आपण मांडतो आहोत पण ही संकल्पना आपल्याला कळली तरी अद्याप वळली नाही, हेच खरे. 

प्रश्न - करोना विषाणूमुळे होणारा आजार नेमका कसा पसरतो? 

उत्तर - करोना विषाणू मुळे होणारा आजार हा आजार हवेवाटे शिंकण्या खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो. करोना विषाणूचे मूळ स्थान प्राणी जगतात आहे. 

प्रश्न - कोरोना संसर्गाने संपूर्ण जग हादरून गेलं आहे. अनेक लोकांना संसर्ग झाला आहे. या आजारावर उपचार उपलब्ध आहे का? 

उत्तर - करोना विषाणू आजारावर कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णास त्याच्या लक्षणानुसार उपचार केले जातात. 

#COVID19 कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस?

प्रश्न - करोना संसर्ग टाळणे शक्‍य आहे का? हा आजार होऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी ? 

उत्तर - 1) श्वसनसंस्थेचे विकार असणा-या व्यक्तीशी संपर्क ठेवताना संसर्ग न होण्याची काळजी घेणे. 
2) हात वारंवार धुणे. 
3) शिंकताना, खोकताना नाकातोंडावर रुमाल अथवा टिश्‍यू पेपर धरणे. 
4) घर आणि कार्यालयातील टेबल, की बोर्ड, डोअर नॉब, टी पॉय असे वारंवार स्पर्श होणारे पृष्ठभाग निर्जंतुक करणे आवश्‍यक आहे. 
5) अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये. 
6) फळे, भाज्या न धूता खाऊ नयेत. 

प्रश्न - कोरोनाची लक्षण आढळल्यास संशयिताने नेमके काय करावे ? 

उत्तर - खाली नमूद केलेल्या व्यक्तींनी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा - 
श्वसनास त्रास होणा-या व्यक्ती आणि रुग्णाने बाधित देशात प्रवास केला असल्यास किंवा बाधित रुग्णाशी संपर्क आला असल्यास. 

प्रश्न - नवीन कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी शासन स्थरावर काय प्रयत्न करण्यात येत आहेत? 

उत्तर - नवीन करोना विषाणू ( कोविड -19 ) नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. करोना विषाणू आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात पुढील उपाय योजना राबविण्यात येत आहेत - 

1. आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे स्क्रीनिंग - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार करोना बाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग मुंबई,पुणे व नागपूरसह देशातील 30 विमानतळांवर सुरू करण्यात आले आहे.सध्या सर्व देशातील प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात येत असुन चीन, हॉगकॉग, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, जपान, द. कोरिया,नेपाळ, इराण आणि इटली या देशांमधून येणा-या प्रवाशांचा पाठपुरावा आयडीएसपी मार्फत करण्यात येत आहे. 

2.बंदरावर परदेशातून येणा-या जहाजांची तपासणी - राज्यातील मोठया तसेच सर्व लहान बंदरांवरही कोविड -19 आजाराच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणा-या प्रत्येक जहाजाची तपासणी करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने आवश्‍यक खबरदारी घेण्यात येत आहे. 

3. बाधित देशातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा - जे प्रवासी करोना बाधित देशातून भारतामध्ये येत आहेत त्यांची माहिती दैनंदिन स्वरूपामध्ये विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत राज्य आरोग्य विभागास कळविली जाते. 

#COVID19 कोरोना राक्षसाला मारतायत आपल्याच शरीरातील 'हे' पोलिस, वाचा एक महत्त्वाचा रिपोर्ट !

प्रश्न - कोरोना बाधित देशातून अनेक प्रवासी राज्यात आले आहेत. त्यांच्या बाबत नेमकी काय खबरदारी घेण्यात येत आहे? 

उत्तर - केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणा-या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते. 

- करोना बाधित असणा-या देशातून आलेल्या आणि लक्षणे नसलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. 

- बाधित भागातून येणा-या प्रत्येक प्रवाशाला 14 दिवसांकरिता घरी थांबण्यास (होम आयसोलेशन) सांगण्यात आले आहे. 

- या सर्व प्रवाशांचा ते बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील 14 दिवस दैनंदिन पाठपुरावा करण्यात येतो. त्यांच्यामध्ये करोना आजार सदृश्‍य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते. 

- याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळवण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सुचित करण्यात आले आहे. 

- या दैनंदिन पाठपुराव्यामध्ये एखाद्या प्रवाशामध्ये संशयित करोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्यात येते. 

- भारत सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आज मध्यरात्रीपासून जे प्रवासी चीन, इटली, इराण, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी मधून भारतात येतील त्यांना 14 दिवसांकरिता क्वारंटाईन करण्यात येत आहे. 

प्रश्न - प्रयोगशाळा निदान व्यवस्था काय करण्यात आली आहे? 

उत्तर - प्रयोगशाळा निदान व्यवस्था- नवीन करोना विषाणु आजाराच्या रुग्ण निदानाची व्यवस्था राज्यात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एन आय व्ही), पुणे , कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई , इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर या प्रयोगशाळांमध्ये करण्यात आलेली आहे. 

#COVID19 : मास्क नक्की कसा वापरावा? १० अत्यंत महत्त्वाच्या टिप्स...

प्रश्न - राज्यात विलगीकरण कक्ष आणि उपचार व्यवस्था पुरेशी आहे का

उत्तर - संशयित करोना आजारी रुग्णांना भरती करण्यासाठी सध्या मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यात नायडू रुग्णालय येथे आवश्‍यक विलगीकरण व उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या शिवाय प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आणि शसकीय वैद्यकीय महाविद्यालयातही विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. 

प्रश्न - विलगिकरण कक्ष वाढवण्याची आवश्‍यकता आहे का? खासगी रुग्णालयात ही विलगिकरण कक्ष सुरू करण्यात येणार आहेत का? 

उत्तर - खासगी रुग्णालयातही विलगीकरण कक्ष सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचनाकोविड 19 आजाराच्या उद्रेकाचे स्वरुप लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने खाजगी रुग्णालयांमध्येदेखील विलगीकरण कक्ष सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

प्रश्न - आपल्याकडे आवश्‍यक पीपीई किट,मास्क इत्यादींचा पुरेसा साठा आहे का? 

उत्तर - आपल्याकडे पी पी ई कीट, मास्क, आणि इतर साहित्य आवश्‍यक प्रमाणात उपलब्ध आहे. त्याशिवाय आपण राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सर्वसामान्य जनता, वैद्यकीय व्यावसायिक आणि बाधित भागातून आलेल्या प्रवाशांसाठी आरोग्य शिक्षण विषयक साहित्य तयार करण्यात आले असून ते सर्व संबंधितांना वितरित करण्यात आले आहे. रेडिओ जिंगल्स, टीव्ही स्पॉट आदी आरोग्य शिक्षण साहित्यासोबतच फेसबुक पेज आणि ट्विटर अशा समाजमाध्यमांचा वापरही करण्यात येत आहे. 

प्रश्न - कोरोना संसर्गाबाबत आपल्याकडे अनेक अफवा पसरल्या आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर काय कारवाई करण्यात येत आहे? 

उत्तर - सोशल मिडियावर करोना संदर्भात विविध अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भिती उत्पन्न करणारे संदेश फिरताना दिसत आहेत. असे कोणतेही संदेश हे अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करुन घेतल्याशिवाय पुढे पाठवू नयेत तसेच आवश्‍यक असल्यास नागरिकांनी हेल्प लाईन लाफोन करुन शंका निरसन करुन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात साथरोग अधिनियम कायदा लागू केल्यामुळे अशा अफवा पसरविणा-या मंडळींवर कायदेशीर कारवाई करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. 

प्रश्न - राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्या संबंधी काम करणाऱ्या राज्य आणि जिल्हास्तरीयअधिका-यांना आपण प्रशिक्षण दिले आहे का? 

उत्तर - राज्यपातळीवर विशेष प्रशिक्षण सत्रे घेऊन राज्यातील 205 अधिका-यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरही अशी प्रशिक्षण सत्रे घेण्यात येत आहेत. 

प्रश्न - कोरोना संसर्गामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. लोकांनी आपल्या शंका-कुशंकांचे निरसन कसे करावे ? 

उत्तर - करोना नियंत्रण कक्ष- सर्वसामान्य नागरिकांसाठी टोल फ्री 104 क्रमांक करोना विषयक शंकासमाधानासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. याशिवाय संचालक आरोग्य सेवा पुणे कार्यालयात करोना नियंत्रण कक्ष स्थापन (020-26127394) करण्यात आला असून तो 24 X 7 या कालावधीत कार्यरत आहे. नवीन करोना विषाणू आजाराबद्दलच्या मार्गदर्शक सूचना सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून त्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत. 

special report on corona and various question that we have about covid 19