नवी मुंबईच्या माजी महापौरांनी केला ‘हा’ गौप्यस्फोट; संतापले नगरसेवक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 December 2019

ऐरोलीतील आंबेडकर स्मारकाचे काम का रखडले, असा प्रश्न नगरसेवक संजू वाडे यांनी सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विचारला. या वेळी स्मारकाच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत, टक्केवारीमुळे काम रखडले असल्याचा आरोप माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी केला.

नवी मुंबई : ऐरोली, सेक्‍टर १५ मधील भूखंड क्रमांक २२ ए येथे नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आंबेडकर स्मारकाचे उभारण्यात येत आहे; मात्र मागील काही महिन्यांपासून स्मारकाचे हे काम बंद आहे. स्मारकाचे हे काम का रखडले, असा प्रश्न नगरसेवक संजू वाडे यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विचारला. या वेळी  स्मारकाच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत, टक्केवारीमुळे काम रखडले असल्याचा आरोप माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी सर्वसाधारण सभेत केला.

ही बातमी वाचली का? मुंबई-पुणे प्रवास होणार वेगवान! मिळाली ‘ही’ परवानगी

ऐरोली, सेक्‍टर १५ येथील आंबेडकर स्मारकाचे काम एप्रिल २०११ पासून सुरू असून, एप्रिल २०१३ पर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र या वास्तूचे पहिल्या टप्प्यातील काम हे नोव्हेंबर २०१७ पर्यंत पूर्ण झाले. या स्मारकाला १६० फूट उंचीचा डोम बसवण्यात आला आहे. या डोमला मार्बल लावण्याच्या कामामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे मागील सहा महिन्यांपासून काम हे बंद आहे. या स्मारकांच्या रखडलेल्या कामामुळे सभागृहात नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. नगरसेवक संजू वाडे यांनी स्मारकाला डॉ. बाबासाहेब आबेडकरांचे नाव असल्यामुळे जाणूनबुजून उशीर होत असल्याचा आरोप वाडे यांनी केला. या वेळी शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी स्मारकाचे काम हे तांत्रिक कामामुळे रखडले असून, त्यासाठी कमिटी नेमण्यात येणार आहे. तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावर माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी प्रशासनावर संताप व्यक्त करत स्मारकांच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला. टक्केवारीमुळे काम रखडले असल्याचेही ते म्हणाले. टक्केवारीच्या आरोपामुळे सभागृहातील विरोधी पक्षांनीदेखील चर्चेत सहभाग घेत प्रशासनाला धारेवर धरले. 

ही बातमी वाचली का? लवकरचं कर्जमाफी होणार! अजित पवार यांची ग्वाही

आंबेडकर स्मारकामध्ये टक्केवारीवर काम होत असेल, तर ही निंदनीय बाब आहे. पुरावे असतील, तर ते सादर करण्यात यावे. त्याची शहानिशा करून कारवाई करण्यात येईल.
- जयंवत सुतार, महापौर, नवी मुंबई महापालिका.

स्मारकाचे काम हे दोन टप्प्यांत असून, हॉल व डोम असे भाग आहेत. या रखडलेल्या कामासाठी समिती नेमण्यात येईल. डोममध्ये तांत्रिक बाबी असल्यास त्यांची पाहणी करून, प्रशासनाकडून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्यात येईल. त्याचप्रमाणे टक्केवारीचा जो आरोप करण्यात आला. त्याबद्दल चौकशीचे आदेश देऊन, दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Percent acceptance of airoli Ambedkar monument