मालवणीत दलित कुटुंबांचा वस्ती सोडण्यासाठी छळ; भाजपचा कुटुंबांना पाठिंबा

कृष्ण जोशी
Sunday, 10 January 2021

  • मालाडच्या मालवणी विभागात काही अनुसुचित जाती-जमातीच्या कुटुंबांचा छळ करून घरे सोडण्यासाठी त्यांच्यावर दडपण आणले जात असल्याच्या आरोपांबाबत स्वयंसेवी संस्था व्हॉइस ऑफ मुंबई तपासणी करणार आहे.
  • भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीही या कुटुंबांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.  

मुंबई  ः मालाडच्या मालवणी विभागात काही अनुसुचित जाती-जमातीच्या कुटुंबांचा छळ करून घरे सोडण्यासाठी त्यांच्यावर दडपण आणले जात असल्याच्या आरोपांबाबत स्वयंसेवी संस्था व्हॉइस ऑफ मुंबई तपासणी करणार आहे. तर भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनीही या कुटुंबांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.  

 

मालवणीच्या एका वस्तीत पूर्वी किमान शंभर अनुसूचित जाती-जमातींची कुटुंबे होती. मात्र तेथील गुंडांकडून त्यांच्यावर वस्ती सोडण्याकरता दबाव आणला गेल्याचा आरोप होत आहे. अशा स्थितीत कित्येक कुटुंबांनी वस्ती सोडली व आता तेथे आठ-दहा कुटुंबेच उरली आहेत. त्यांनाही प्रचंड छळवादाला तोंड द्यावे लागत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नुकतेच भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्या वस्तीत जाऊन या कुटुंबियांची भेट घेतली. या कुटुंबांनी दबावाला बळी पडू नये, भाजप सर्वशक्तीनिशी या कुटुंबांच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

काश्मीरमधून हिंदू पंडितांची हकालपट्टी करण्यात आली, तशाच पद्धतीने हे प्रकार सुरु आहेत. याप्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली पाहिजे, मात्र पोलिस दबावाखाली कारवाई करीत नाहीत. मात्र आम्ही हे प्रकरण धसास लावू, असेही लोढा यांनी यासंदर्भात सकाळ ला सांगितले. दरम्यान या अनुसुचित जाती-जमातीच्या कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेण्याकरिता व्हॉईस ऑफ मुंबई या संस्थेतर्फे माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी यादवराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘सत्यशोधक समिती’ पुढील आठवड्यात तेथे जाणार आहे. या छळाविषयीच्या बातम्या काही वर्तमापत्रात प्रसिद्ध झाल्याने सत्य तपासण्यासाठी ही समिती तेथे जाणार आहे. या समितीत लेखिका आणि वीरमाता अनुराधा गोरे, पत्रकार उदय निरगुडकर, पत्रकार योगिता साळवी सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मनप्रीत सिंह तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गाडे यांचा समावेश आहे. ही माहिती व्हॉईस ऑफ मुंबई च्या पत्रकात देण्यात आली आहे.

Persecution of Dalit families for leaving their homes in Malvani in Mumbai BJP supports families

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Persecution of Dalit families for leaving their homes in Malvani in Mumbai BJP supports families