राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना हटविण्यासाठी हायकोर्टात याचिका

सुनीता महामुणकर
Thursday, 29 October 2020

लव जिहादवरुन वादात सापडलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 

मुंबई: लव जिहादवरुन वादात सापडलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. शर्मा यांची मानसिकता महिला अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी निष्पक्ष आणि सक्षम नाही, असा आरोप याचिकेत केला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ही याचिका केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. महिलांवरील अत्याचारांबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट होती. या भेटीबाबत त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करुन माहिती दिली होती.

यामध्ये लव जिहादच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करणारे ट्विट केले होते. मात्र अशा ट्विटमधून धार्मिक तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे महिलांविरोधातील गुन्हे निर्धमीपणे आणि निष्पक्षपणे हाताळण्यासाठी त्या मानसिक दृष्टीने सक्षम नाही, हेच सिद्ध होत आहे, असा दावा याचिकेत केला आहे.

अधिक वाचा-  यंदा STची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द,अनिल परब यांनी केली मोठी घोषणा

लव जिहाद ही संकल्पना अद्याप कायद्याच्या कक्षेत मांडलेली नाही आणि कोणत्याही तपास यंत्रणेने त्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. केवळ केरळमध्ये दोन आंतरधर्मीय विवाहाचा तपास एनआयए करीत आहे, असेही यामध्ये सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा-  पक्ष महत्वाचा की सरकार उद्धव ठाकरेंना पडलेला प्रश्न- भाजप

राष्ट्रीय महिला आयोग कायद्यातील तरतुदींचा भंग केल्यामुळे त्यांना या पदावर ठेऊ नये, अशी मागणी याचिकादाराने केली आहे. लवजिहादचा उल्लेख करुन दोन धर्माच्या व्यक्तींमधील विश्वासाला तडा देण्याचा आणि अप्रत्यक्षपणे असुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वीही शर्मा यांनी अशाप्रकारे ट्विट केले आहेत, मात्र केंद्र सरकारने त्यांच्या वर कारवाई केली नाही, असेही याचिकेत निदर्शनास आणले आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

-------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Petition Bombay High Court remove chairperson National Commission for Women


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petition Bombay High Court remove chairperson National Commission for Women