भाजप समर्थकाला कोर्टानेही फटकारलं; लग्नानंतरच्या घटस्फोटात नवीन काय?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

लग्नानंतर घटस्फोट होण नवीन आहे का, असा टोलाही न्यायालयाने भाजप समर्थक याचिकादारांना लगावला आहे. 

मुंबई : शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज होणाऱ्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकादारांना तातडीने दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. लग्नानंतर घटस्फोट होण नवीन आहे का, असा टोलाही न्यायालयाने भाजप समर्थक याचिकादारांना लगावला आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

विधानसभा निवडणुकांच्या नंतर राज्यामध्ये सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला होता. मात्र आता शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने महाविकासआघाडी तयार करुन सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. या पार्श्‍वभूमीवर आज मुख्यमंत्री म्हणून ठाकरे शपथ ग्रहण करणार आहेत. मात्र निवडणुकीआधी भाजप आणि शिवसेनेने युती करुन मतदारांना मत देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मतदारांनी त्यांना सर्वाधिक मताधिक्‍यांनी निवडूनही दिले आहे. मात्र आता भाजपशी वेगळे होऊन शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी सूत जुळविले आणि सरकार स्थापन करीत आहे. मात्र मतदारांचा विश्‍वासघात करुन असे करता येऊ शकत नाही, त्यामुळे दोन्ही शिवसेना भाजपनेच पुन्हा एकत्र यावे, अशी मागणी काही भाजपच्या मतदारांनी याचिकेद्वारे केली आहे. यामध्ये रोहिणी अमीन, मोहीत अमीन आदीं मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मत दिले.

राज्यात आजपासून उद्धव सरकार  

याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी यासाठी याचिकादार वकिल मॅथ्यू नेदुमपारा यांनी याचिकेचा उल्लेख मुख्य न्या. प्रदीप नंदराजोग आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे केला. मात्र तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. या शपथविधीमध्ये घटनाबाह्य आणि अवैध असे काय आहे, असा सवालही न्यायालयाने याचिकादाराला केला. दोन्ही पक्षांनी मतदारांचा विश्‍वासघात केला, असा दावा याचिकादाराकडून करण्यात आला. मात्र, कायदेशीर विवाहांमध्ये घटस्फोट होण्याची पद्धत नवी आहे का, असा उपरोधिक सवाल खंडपीठाने केला.

भाजपला निवडणुकीत 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसला 54 तर कॉंग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: petition on hold by high court against Uddhav Thackeray oath taking ceremony