esakal | फोटोग्राफर आले, स्वतःचे फोटो काढून गेले; मुख्यमंत्र्यांच्या कोरड्या दौऱ्यावर भाजपची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोग्राफर आले, स्वतःचे फोटो काढून गेले; मुख्यमंत्र्यांच्या कोरड्या दौऱ्यावर भाजपची टीका

पूरग्रस्तांना मदत नाकारणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी, सोलापूरच्या आकाशात तोंडच्या वाफेचे ढग, असा टोला लगावला आहे

फोटोग्राफर आले, स्वतःचे फोटो काढून गेले; मुख्यमंत्र्यांच्या कोरड्या दौऱ्यावर भाजपची टीका

sakal_logo
By
कृष्ण जोशी


मुंबई ः पूरग्रस्तांना मदत नाकारणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी, सोलापूरच्या आकाशात तोंडच्या वाफेचे ढग, असा टोला लगावला आहे. फोटोग्राफर आले अन स्वतःचे फोटो काढून गेले, अशी बोचरी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ट्वीट द्वारे केली आहे. 

आश्वासनेच द्यायची होती तर निदान मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ तरी जाहीर करायला हवा होता. त्यामुळे सरकारी यंत्रणा तरी हलली असती व मदत देण्यास सुरुवात तरी झाली असती. मात्र त्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यातच धन्यता मानली, हे योग्य नाही, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले. 

मदत इतक्या लौकर जाहीर करणार नाही, असे ठाकरे यांनी दौऱ्यात सांगितले. मात्र आता पूर येऊन आठ दिवस झाले आहेत. निदान मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ व नजर पंचनामे जाहीर केले असते तर त्या निकषांनुसार पुढील कार्यवाही झाली असती. त्याप्रमाणे सरकारी यंत्रणेने तात्पुरते निवारे, वीजपुरवठा इत्यादी कामे सुरु केली असती. मात्र ओला दुष्काळग्रस्तांना यातले काहीही मिळाले नाही, अशी टीकाही भातखळकर यांनी केली. 

स्वतः मदत जाहीर करण्याऐवजी ठाकरे केंद्राकडे मदत मागत आहेत. पण राज्याने मदत दिली तर त्यानुसार केंद्र सरकार मदत देते. आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून मदत देणार नाही, असे राज्य सरकार म्हणत आहे. मात्र राज्य सरकारकडे पैसे नाहीत असे कधीच होत नाही. निदान राज्य सरकारने ठरलेल्या निकषांनुसार केंद्राला अहवाल पाठवावा, त्यानुसार केंद्र सरकार दुष्काळग्रस्त भागांच्या पहाणीसाठी पथक पाठवेल. काही महिन्यांपूर्वी कोकणातही केंद्राचे पथक आले होते, मात्र त्याला उशीर झाला होता. याचे कारण म्हणजे मुळात राज्याने केंद्राला यासंदर्भात जेमतेम एक पानी पत्र पाठविले होते. याबाबतीतल्या निकषांनुसार हे पत्र जायला हवे होते, ते झाले नाही, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले. 

पूग्रस्तांनो तुम्ही काळजी घ्या, सावध रहा, पण एवढ्यात मी मदत जाहीर करणार नाही, हे सांगायला ठाकरे यांना सोलापूरला जायची गरज नव्हती. ते नेहमीप्रमाणे घरबसल्याही सांगता आले असते, असा टोला लगावून भातखळकर पुढे म्हणाले की, राज्याचा प्रशासनप्रमुख या नात्याने आपण या विषयावर सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे जाऊ, असे ठाकरे यांनी जाहीर करायला हवे होते. त्याऐवजी ते फडणवीसांवर टीका करण्यास मश्गूल आहेत.

Photographers came took photos of themselves BJP criticizes CMs visit

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image