पतीचे नाव, आडनाव एकच; दोन महिला उमेदवारांची जाहिरात व्हायरल!

टीम ई सकाळ
Friday, 8 January 2021

एकाच वॉर्डमध्ये नवऱ्याने दोन बायकांना उभा केलं असा दावा केला जात आहे. तसंच आता नवरा प्रचार कोणाचा करणार आणि मत कुणाला देणार असंही म्हटलं जात आहे. 

ठाणे - नावात काय आहे असं सहज बोलून जातात पण याच नावाचा निवडणुकांमध्ये विरोधी उमेदवाराची मते खाण्यासाठी वापर केला जातो. अशाच एका नाम साधर्म्यामुळे एका ग्रामपंचायतीच्या उमेदवारांची चर्चा राज्यभर सुरू आहे. भिवंडी तालुक्यात असलेल्या पिंपळास इथला एक फोटो व्हायरल होत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उभा असलेल्या महिला उमेदवारांच्या प्रचारासाठीचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यात दोन्ही महिला उमेदवारांच्या पतींना मोठा त्रास झालाय. 

पिंपळास ग्रामपंचायतीतल्या वॉर्ड क्रमांक 4 ड मधून सुजाता कल्पेश म्हस्के आणि कोमल कल्पेश म्हस्के या दोघींनी उमेदवांरी दाखल केली आहे. सुजाता आणि कोमल यांच्या पतींची नावांमध्ये असलेल्या साधर्म्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दोघींचे पती नातेवाईक असून सुजाता यांच्या पतीचे पूर्ण नाव कल्पेश बारक्या म्हस्के असं आहे. तर कोमल यांच्या पतीचे नाव कल्पेश सुरेश म्हस्के असं आहे. 

कोमल आणि सुजाता या दोघीही एकाच वॉर्डमधून शिवसेना पुरस्कृत अग्निमाता ग्रामविकास पॅनेलमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या नावात असलेल्या साम्यामुळे मतदारही गोंधळात पडले आहेत. निवडणूक निकालात या गोंधळाचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

हे वाचा - ग्रामपंचातीच्या निवडणुकीत उच्चशिक्षीत पती-पत्नी आमनेसामने

दरम्यान, सोशल मीडियावर प्रचाराचे पोस्टर प्रचंड व्हायरल झाले आहे. त्यात एकाच वॉर्डमध्ये नवऱ्याने दोन बायकांना उभा केलं असा दावा केला जात आहे. तसंच आता नवरा प्रचार कोणाचा करणार आणि मत कुणाला देणार असंही म्हटलं जात आहे. या पोस्टचा त्रास दोन्ही महिला उमेदवारांसह त्यांच्या पतींना आणि कुटुंबियांनाही होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimplas garmpanchayat election campaign two women same husband name post viral