प्लाझ्मा दानाच्या जनजागृतीसाठी पालिकेची परीक्षा, पालिका रुग्णालयात प्लाझ्मा दानाचं प्रमाण कमी

भाग्यश्री भुवड
Friday, 9 October 2020

प्लाझ्मा दानासाठी वारंवार आवाहन करुनही मुंबईकर तरुण मंडळी या प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घेत नसल्याचे समोर येत आहे. मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत प्लाझ्मा दान मोहिमेला प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य आहे. 

मुंबई: कोरोनावर प्रभावी पर्याय म्हणून प्लाझ्मा उपचार पद्धती सध्या पालिका रुग्णालयात सुरू आहे. मात्र, प्लाझ्मा दानासाठी वारंवार आवाहन करुनही मुंबईकर तरुण मंडळी या प्लाझ्मा दानासाठी पुढाकार घेत नसल्याचे समोर येत आहे. मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत प्लाझ्मा दान मोहिमेला प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या अगदी नगण्य आहे. 

सध्या मुंबई भागातील 1 लाख 83 हजार 42 लोक कोरोना मुक्त झालेत, असे असूनही फक्त हजारापेक्षाही कमी जणांकडून प्लाझ्मा दान झाले असल्याची माहिती पालिका प्लाझ्मा दान केंद्राकडून मिळाली आहे.  लोकांनी प्लाझ्मा दान करावे यासाठी समुपदेशन ही केले जात आहे. मात्र, बरे झालेले लोक निरुत्साही असल्याचा अनुभव पालिका रुग्णालयांना येत आहे. कोरोना काळाच्या मध्यावर असतानाच प्लाझ्मा दान उपचाराचा पर्याय सुचवण्यात आला होता. तो काही प्रमाणात यशस्वी ही झाला. मात्र, प्लाझ्मा दात्यांची संख्या कमी बरे होणाऱ्यांच्या संख्येत फारच कमी आहे.

प्लाझ्मा थेरेपी हा कोरोनावर अद्यापही प्रभावी उपचार नाही. मात्र, ऑफ लेबल देण्यात आलेल्या कोरोना रुग्णांना याचा फायदा होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, प्लाझ्मा दानासाठी आवाहन केले जात आहे. यात काही जणांनी प्लाझ्मा दान केल्याने प्लाझ्मा थेरेपीचा उपचार म्हणून प्रयोग करण्यात आला.

अधिक वाचाः  शोभा देशपांडेंच्या आंदोलनावर मनसे आक्रमक, संदीप देशपांडेंकडून  दुकानादाराला चोप

यावर बोलताना केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले की, केईएम रुग्णालयातून 35 ते 40 जणांना ऑफ लेबल प्लाझ्मा देण्यात आला आहे. रुग्णालयाला सेवाभावी संस्था मदत करत असून लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून दानासाठी पुढाकार घेतला होता. त्यामध्ये जवळपास 350 दात्यांनी प्लाझ्मा दान केला होता. जो रुग्णालयाच्या रक्तपेढीत संकलित असून इतर रुग्णांना ही दिला जात आहे. 

अधिक वाचाः  व्होकल कोरोना टेस्टिंगला गती, एका महिन्यात गोळा केले 1400 आवाजाचे नमुने

 
समुपदेशानंतरही प्लाझ्मा दानासाठी निरुत्साह

पालिका प्रमुख रुग्णालयांमधून प्लाझ्मा संकलित करण्यात येत असला तरीही दानासाठी अल्प प्रतिसाद येत आहे. दरम्यान, कोरोना मुक्त रुग्णांना फोन करून प्लाझ्मा दानासाठी इच्छूक आहेत का असे विचारले जाते. प्लाझ्मा दानासाठी समुपदेशन करुन त्यांना प्लाझ्मा दानासाठी बोलावले जात असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (आरोग्य ) यांनी सांगितले.

कोरोनाची भीती कायम आणि समस्या कायम

नायर रुग्णालयात 260 जणांनी तर केईएम रुग्णालयात 350 जणांनी असे तीन रुग्णालये मिळून 700 ते 750 जणांनी प्लाझ्मा दान केले. कोरोनानंतर उद्भवणाऱ्या समस्यांमुळे इच्छूक दान करण्यास येत नसावेत,  मात्र समुपदेशन सुरु आहे. 

डॉ. रमेश भारमल, संचालक, प्रमुख  पालिका रुग्णालये

तरुणांच्या पुढाकाराची गरज

आधी ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह येत होते. मात्र, आता तरुणांची संख्या वाढली आहे. जे लोक बरे होऊन घरी जातात त्यांना आम्ही प्लाझ्मा देण्यासाठी पुन्हा बोलावतो. पण, 100 पैकी 10 जण जर दानासाठी आले तर त्यातील फक्त 5 ते 6 जण दान करतात. प्लाझ्मा घेण्याची जी प्रक्रिया ती किमान 2 तासांची असते. शिवाय, प्लाझ्मा दाता तब्येतीने सुदढ असले पाहिजे. त्यांच्यात ठराविक अँटीबॉडीज ही तयार होण्याची गरज असते. तरच त्या व्यक्तीचा प्लाझ्मा घेऊन फायदा असतो. त्यामुळे, आता तरुणांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. शिवाय, प्लाझ्मा दानासाठी किमान 2 दिवस रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे, बरे होण्याच्या तुलनेत फारच कमी दाते पुढाकार घेत आहेत. तसंच, प्लाझ्मा विषयी जास्त माहिती ही नसल्याने लोक जास्त प्रतिसाद देत नाही. प्लाझ्मा गोळा करण्यासाठी ही बराच खर्च येतो. दिवसाला किमान 5 ते 7 जणांचा प्लाझ्मा घेता येऊ शकतो. 

डॉ. मोहन जोशी , अधिष्ठाता, सायन रुग्णालय

प्लाझ्मा दानाची सद्यपरिस्थिती 

  • नायर रुग्णालय  - 260 दाता 
  • केईएम रुग्णालय - 350 दाता 
  • सायन रुग्णालय - 100 पेक्षा कमी दाता

-----------------------

(संपादनः पूजा विचारे)

Plasma donation from less than a thousand people mumbai bmc hospitals


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plasma donation from less than a thousand people mumbai bmc hospitals