ठाण्यात प्लास्टिक बंदीचा फज्जा 

राजेश मोरे
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

ठाणे शहरात 20 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असताना महापालिका केवळ स्वतः केलेल्या दंडात्मक कारवाईवर खूश होताना दिसत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदी ही केवळ कागदावरच आणि काही काळाच्या कारवाईपुरतीच मर्यादित आहे काय, असा प्रश्‍न ठाणेकरांना पडला आहे.

ठाणे : ठाणे शहरात 20 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असताना महापालिका केवळ स्वतः केलेल्या दंडात्मक कारवाईवर खूश होताना दिसत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदी ही केवळ कागदावरच आणि काही काळाच्या कारवाईपुरतीच मर्यादित आहे काय, असा प्रश्‍न ठाणेकरांना पडला आहे. गेल्या दहा महिन्यांत महापालिकेने कारवाई करून सुमारे 20 टन प्लास्टिकचा साठा जप्त केला; तर नोव्हेंबर महिनाअखेर महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईमध्ये तब्बल पाच टन 70 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले; तर दंड म्हणून 1 लाख 90 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. 

नदी-नाल्यांचे वाढत्या प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण, पर्यायाने पर्यावरणाला पोहचणारा धोका लक्षात घेऊन प्लास्टिक बंदीचा निर्णय राज्याचे तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घेतला होता; पण प्लास्टिक बंदी ही केवळ आरंभशूर घोषणा ठरली असून राज्यासह ठाण्यातही प्लास्टिकवरील बंदीचा बोजवारा उडाला आहे.

महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या वतीने 2018-19 या आर्थिक वर्षात नागरिकांकडून एकूण 20 टन 50 किलो प्लास्टिक जमा करण्यात आले आहे; तर इतर व्यावसायिक ठिकाणाहून 72 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून दंड म्हणून 9 लाख 40 लाख एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे. तसेच सन 2019-20 या आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत आस्थापनांवर करण्यात आलेल्या कारवाईमधून पाच टन 70 लाख किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. 

विशेष म्हणजे ठाणे शहरात 20 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे. सुरुवातीच्या काळात या बंदीचा धसका सर्वच दुकानदारांनी घेऊन आपल्या दुकानातून प्लास्टिकच्या पिशव्या हद्दपार केल्या होत्या. तसेच मोठ्या दुकानांमधून मिळणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा पुनर्वापर होत होता. त्याउलट फेरीवाले अथवा किरकोळ व्यापाऱ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा पुनर्वापर होत नव्हता. अशा वेळी या कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांना पायबंद घालणे अपेक्षित होते; पण प्लास्टिक बंदीनंतर मोठ्या दुकानांमधून मिळणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या तर बंद झाल्या; पण फेरीवाल्यांकडील प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रास वाढला आहे. 

अधिकाऱ्यांना प्लास्टिकचा खच दिसत नाही! 
सध्या ठाण्यातील जांभळी नाका परिसरात सकाळी मोठ्या प्रमाणात घाऊक भाजीविक्रेत्यांचा बाजार भरतो. येथे शहरातील इतर किरकोळ भाजीविक्रेते तसेच ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात. या किरकोळ विक्रेत्यांना येथील घाऊक विक्रेते कमी जाडीच्या पिशव्यांमधून सर्रास भाजी देताना आढळतात. हा बाजार साडेआठनंतर बंद होतो. त्यानंतर या परिसरात प्लास्टिकच्या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात खच पडल्याचे दिसते; पण कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

प्लास्टिक बंदी अमलात आणण्याच्या सक्त सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. ठराविक विभागात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी होत नसल्याचे निर्दशनास आल्यास त्यावर तत्काळ कारवाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले जातील. कमी जाडीच्या पिशव्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी महापालिकेकडून प्राधान्य दिले जात आहे. काही लपूनछपून प्लास्टिकचा वापर करत असल्यास त्यावर कारवाई केली जाईल. 
- संदीप माळवी, उपायुक्त 
ठाणे महापालिका 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plastic ban in Thane